धरणगाव (प्रतिनिधी) फसवणुकीच्या गुन्ह्यातून धरणगावाच्या दोघांची नुकतीच निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय न्यायलयाने दिला आहे.
येथील रहिवासी अनिता सुनील चौधरी, विजय छंदलाल गाडी लोहार, मयूर भालचंद्र बागुल व प्रतिभा भालचंद्र बागुल यांच्या मालकीच्या धरणगावातील गट क्रमांक ५३८ विक्रीबाबत सौदा पावती करण्यात आली होती. परंतु, विजय गाडी लोहार, मयूर भालचंद्र बागुल, प्रतिभा भालचंद्र बागुल यांनी शेत खरेदी करण्यास नकार दिल्यामुळे अनिता सुनील चौधरी यांनी याबाबत फसवणूकप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
यात विजय छंदलाल गाडी लोहार, मयूर भालचंद्र बागुल व प्रतिभा भालचंद्र बागुल व प्लॉट खरेदी केल्याप्रकरणी दीपक रामकृष्ण गांगुर्डे यांच्या विरोधात फिर्यादी होती. त्याप्रमाणे धरणगाव पोलिसांनी तपास करून त्यांच्याविरोधात भादंवी कलम ४२०, ४०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर संशयितांना अटक केली होती.
या प्रकरणात तपास केल्यानंतर धरणगाव पोलिसांनी धरणगाव न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्याचे कामकाज धरणगाव न्यायालयाचे न्यायाधीशांसमोर होऊन संशयितांना या गुन्ह्यातून दोषमुक्त केले आहे. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे सरकारी वकील आर. एस. हटकर यांनी तर संशयितांतर्फे अॅड. व्ही. एस. भोलाणे यांनी कामकाज पाहिले.