जळगाव (प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आगामी सर्व निवडणुकांमध्ये एकत्र लढवण्याची घोषणा शुक्रवारी केली होती. त्यावर आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीची आम्हाला कुठलीही फिकीर नाही, असे वक्तव्य केले आहे.
शिंदे गट हाच शिवसेनेचा ओरिजनल गट आहे. काम करणाऱ्यांना अशा गोष्टींनी फरक पडत नाही. मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांची प्रतिमा तशी बनवली आहे. त्यामुळे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीची आम्हाला कुठलीही फिकीर नाही. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, विरोध करणे विरोधकांचे काम आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर आम्ही वेगवेगळे निर्णय घेत आहोत. शेतकऱ्यांसाठी, जेष्ठांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामुळे विरोधकांनी कितीही टीका केली तर शेवटी काम जो करतो जनता त्यालाच नमस्कार करते. एकनाथ शिंदे हे काम करणारे मुख्यमंत्री असून कोणत्याही युतीने त्यांना फरक पडत नाही. येणाऱ्या काळात नगरपरिषद, जिल्हा परिषदेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. घोडामैदान आता जास्त दूर नाही. राजसाहेबांनी आपली तयारी सुरु केली आहे. भाजप तयारी करत आहे. उद्धव साहेबांच्या नेतृत्वात त्यांचे लोकं काम करत आहे. आगामी निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल तेव्हा कळेल, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.