मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेचे लावलेले बॅनर फाडल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुषमा अंधारे यांची मुक्ताईनगर येथे सभा आयोजित केली होती. त्या अनुषंगाने मुक्ताईनगर येथे ४ नोव्हेंबर रोजी युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे यांच्या नेतृत्वात सभेची पूर्वतयारी केली होती. मात्र, सभेच्या एक दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांनी सभेची परवानगी नाकारली. यामुळे सभा होऊ शकली नाही. मात्र, या सभेसाठी संपूर्ण शहरांमध्ये होर्डिंग, बॅनर्स लावले होते. यापैकी बस डेपो जवळील रस्त्याच्या कडेला लावलेले महाप्रबोधन यात्रेचे बॅनर ५ नोव्हेंबरच्या रात्री ११ ते ११.४५ वाजेदरम्यान अज्ञात व्यक्तीने फाडले. याप्रकरणी अज्ञाताविरूद्ध मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.