कोल्हापूर (वृत्तसंस्था) तरुणीवर अत्याचार करून तिचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह वाठार दत्त मंदिर (मठी) परिसरातील ओढ्याच्या काठावरील झुडपात टाकून दिल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. तब्बल ८ दिवसांनंतर या खुनाला वाचा फुटली. वडगाव पोलिसांनी सनी अरुण कांबळे (वय २३, रा. वाठार), असे संशयित तरुणास पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून सनी कांबळे हा पिडीत तरुणीचा पाठलाग करून तिला वारंवार त्रास देत होता. हा प्रकार पाहून पिडीतेच्या वडिलांनी सनीला वेळोवेळी समज दिली होती. परंतु तो कुणाचेही ऐकत नव्हता. दरम्यान, सोमवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी पिडीता रात्री कामावरून घरी परतत असताना सनीने तिचा पाठलाग करून तिला अडवून धमकावले व अज्ञातस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला.
पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने तिचा मृतदेह दत्त मंदिर (मठी) परिसरातील ओढ्याकाठच्या झुडपात टाकून दिला. त्यानंतर तो काही झालेच नाही, अशा अविर्भावात निर्ढावलेला चेहरा करून गावात फिरत होता. वडगाव पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे तपासात अडथळे येत होते. दरम्यान, पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत रात्री उशिरा संशयित सनी कांबळे याला शिताफीने अटक केली.
सनीने एकतर्फी प्रेमातून तरुणीवर अमानुष व क्रूरपणे लैंगिक अत्याचार करुन तिचा गळा आवळून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या आठ दिवसांपासून पिडीता बेपत्ता होती; परंतु नातेवाइकांनी ती पूर्वीप्रमाणेच आजीकडे गेली असेल, असा समज करून घेतला होता. दरम्यान, तिचा मृतदेह सोमवारी सडलेल्या अवस्थेत मिळून आला होता. परंतू अंगावरील कपड्यांवरून मृतदेहाची ओळख पटली. आरोपी सनी कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. व्यसनासाठी पैसे उकळत होता. तरुणीबरोबरच्या ओळखीतून संबंध ठेवण्यासाठी तो तिच्यावर दबाव टाकत होता. यावर तिच्याशी भांडणदेखील झाले होते. परगावातील असल्यामुळे भीतीमुळे मृत तरुणी याबाबत फारशी बोलत नव्हती.