बुलढाणा (वृत्तसंस्था) पंढरपूर यात्रेनिमित्त चालक, वाहकाने नेलेल्या बसमध्येच स्टोव्ह पेटवून स्वयंपाक केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने चालक, वाहक कारवाईच्या कचाट्यात सापडले. ही कारवाई टाळण्यासाठी बुलढाणा आगार व्यवस्थापकाने अन्य एका वाहकाच्या माध्यमातून लाच मागितली. दरम्यान, २१ ऑगस्ट रोजी रात्री बुलढाणा- खामगाव मार्गावर सुंदरखेड येथे रचलेल्या सापळ्यात सात हजार रुपये घेताना अधिकाऱ्यासह वाहकाला रंगेहात पकडण्यात आले.
पंढरपूर यात्रेसाठी बुलढाणा आगारातून काही बस गेल्या होत्या. एका बसमध्येच काही कर्मचारी स्टोव्ह पेटवून स्वयंपाक करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणी कारवाई न करण्यासाठी आगार व्यवस्थापक संतोष वानेरे यांनी तक्रारदार कर्मचाऱ्यास ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ३५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यापैकी २८ हजार रुपये आरोपी वानेरे याने आधीच घेतले होते. उर्वरित ७ हजार रुपये देण्यासाठी वानेरेसह महादेव दगडू सावरकर याच्यामार्फत तगादा सुरु होता.
दरम्यान, तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. २१ ऑगस्ट रोजी रात्री सुंदरखेड येथील एका पतसंस्थेसमोर सापळा रचण्यात आला. बुलढाणा आगाराचा व्यवस्थापक संतोष वानेरे व वाहक महादेव सावरकर या दोघांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. पोलीस उपअधीक्षक शीतल घोगरे, पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पोहेकॉ मोहंमद रिझवान, राजू क्षीरसागर, प्रवीण बैरागी, नाईक पोलीस शिपाई विनोद लोखंडे, जगदीश पवार, रवींद्र दळवी, सुनील राऊत गजानन गाल्डे, स्वाती वाणी यांनी ही कारवाई केली.