अकोला (वृत्तसंस्था) दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून पोटच्या मुलाने चाकूने भोसकून आईचा निर्घृण खून केल्याची संतापजनक घटना ८ फेब्रुवारीला सायंकाळी रोजी डोणगाव येथे घडली. धक्कादायक म्हणजे थोरल्या भावाने जाब विचारला असता त्याच्यावरही लोखंडी अँगलने हातापायावर प्रहार करत प्राणघातक हल्ला केला.
चंद्रभागा प्रल्हाद भुतेकर (६८) असे मयत महिलेचे तर किरण प्रल्हाद भुतेकर (४०) असे आरोपीचे नाव आहे. मोठा भाऊ माधव प्रल्हाद भुतेकर (४५) याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. आईचा खून करून भावावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला डोणगाव पोलिसांनी अटक केली आहे.
किरण भुतेकर याला दारू पिण्याचे व्यसन आहे. ८ फेब्रुवारीला सायंकाळी आरोपी किरण घरी आला. सायंकाळी सहाच्या सुमारास त्याने आई चंद्रभागा यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. आईने नकार दिल्याने माथे ठणकलेल्या किरणने मागचा पुढचा काहीच विचार न करता धारदार चाकूने आईच्या पोटात व डाव्या बरगडीवर चाकूने भोसकले. ही घटना समजताच आरोपीचा मोठा भाऊ माधव प्रल्हाद भुतेकर याने आईला दवाखान्यात उपचारार्थ भरती केले. यानंतर घरी परतलेल्या माधवने आरोपी किरणला आईला चाकू का मारला?, याचा जाब विचारला असता किरणने त्याच्यावरदेखील हल्ला केला.
माधवच्या उजव्या हातावर तसेच पायावर लोखडी अँगलने मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, आईची प्रकृती गंभीर असल्याने तिला छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. १० फेब्रुवारीला सायंकाळी चार वाजता उपचार सुरू असताना चंद्रभागा भुतेकर यांची प्राणज्योत मालवली.