जळगाव (प्रतिनिधी) खेळतांना नाल्यात पडलेला चेंडू काढण्यासाठी गेलेला चिमुकला पाण्यात वाहून गेल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल नगरात घडली. सचिन राहुल पवार (वय ६, रा.हरिविठ्ठल नगर, मूळ रा. कुसुंबा, ता. रावेर), असे वाहून गेलेल्या बालकाचे नाव आहे. पोहणाऱ्या तरुणांसह पोलीस व महानगरपालिकेच्या अग्शिमन विभागाकडून रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरु होते. मात्र तो चिमुकला मिळून आला नव्हता.
शहरात शनिवारी दुपारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली, सुमारे तीन तास मुसळधार पाऊस पडल्यामुळे शहरातील नाले दुथडी भरुन वाहत होते. दरम्यान, हरिविठ्ठल नगरात राहणारा सचिन पवार दुपारी चार वाजेच्या सुमारास दहा वर्षाच्या बहिणीसह परिसरातील लहान मुलांसह लिंबू तोडायला गेले होते. याठिकाणी सचिन हा आपल्या मित्रांसोबत चेंडू खेळायला लागला, खेळतांना त्यांचा चेंडू हा जवळच वाहत असलेल्या नाल्यात पडला. चेंडू काढण्यासाठी सचिन हा नाल्याच्या पाण्यात उतरला, मात्र पावसामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे तो वाहत्या पाण्यात वाहून गेला.
सचिन वाहून गेल्याचे लक्षात येताच त्याच्यासोबत असलेल्या लहान मुलांनी आरडाओरडा केली. यावेळी परिसरातील नागरिकांसह सचिनचे कुटुंबिय त्याठिकाणी धाव आले. त्यांनी नाल्याच्या पाण्यात उतरून सचिनचा शोध घेतला, मात्र तरी देखील तो मिळून आला नाही. पाण्यात वाहून गेलेल्या सचिनचे वडिल राहुल किसन पवार हे मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांना पत्नी, सचिन, व मुलगी असा परिवार आहे. चिमुकला पाण्यात वाहून गेल्यामुळे त्याच्या कुटूंबियांनी आक्रोश केला होता, त्यांच्याकडून केला जाणारा आक्रोश पाहून उपस्थितांना देखील अश्रू अनावर झाले होते. हरिविठ्ठल नगर, पिंप्राळा परिसरासह नाल्याचा प्रवाह असलेल्या परिसरात नागरिकांसह कुटुंबियांनी सचिनचा शोध घेत होते, तसेच सायंकाळच्या सुमारास मनपाच्या अग्निशमन विभागाचे पथक देखील त्याठिकाणी दाखल झाले. या पथकाकडून रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरु होते.