नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कर्नाटकातल्या सर्जन असलेल्या एका २३ वर्षीय हिंदू मुलीनं आपल्या मुस्लिम वर्गमित्राशी विवाह करण्याचा निर्णय घेतला असून, तिच्या कुटुंबानं तिला पाठिंबा दिला आहे. मात्र या आंतरजातीय विवाहात चक्क हिंदुत्ववादी नेत्यांनी, तसंच एका हिंदू मठाधिपतींनी हस्तक्षेप केल्याचं समोर आलं आहे. सर्वसामान्य कुटुंबाच्या वैयक्तिक निर्णयात हस्तक्षेप करण्याच्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
ही घटना आहे कर्नाटकमधल्या मंगळुरू इथली. इथल्या एका हिंदू कुटुंबातल्या सर्जन असणाऱ्या डॉ. मेघा या २३ वर्षीय युवतीनं मुस्लिम वर्गमित्राशी नातेसंबंध असल्याचं मान्य करत, त्याच्याशी विवाह करण्याची इच्छा प्रदर्शित केली. डॉक्टर मेघा ही एकुलती एक मुलगी असल्यानं तिच्या पालकांनी तिच्या निर्णयाचा आदर करून त्यासाठी आनंदाने संमती दिली. डॉ. मेघा यांचा डॉ. जाफर हा मुस्लिम वर्गमित्र केरळमधल्या कन्नूर इथल्या मुस्लिम कुटुंबातला मुलगा आहे. दोन्ही कुटुंबांनी आपल्या मुलांच्या विवाहाला आनंदानं संमती देऊन २९ नोव्हेंबरला कन्नूरमधल्या पायंबलम इथल्या अरेबियन बीच रिसॉर्टमध्ये विवाहसोहळा करण्याचं निश्चित केलं. मात्र या विवाहाची आमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि धार्मिक कार्यकर्त्यांनी डॉ. मेघा आणि त्यांच्या कुटुंबाला आंतरजातीय विवाहानंतर येणाऱ्या समस्यांबद्दल कल्पना देण्यास सुरुवात केली. अनेक हिंदुत्ववादी नेत्यांनी डॉ. मेघा आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मुस्लिम व्यक्तीशी लग्न न करण्याचा सल्ला दिला. अर्थात डॉ. मेघा आणि तिचे कुटुंबीय आपल्या निर्णयावर ठाम असून, तिच्या पालकांनी या लग्नाला विरोध करण्याचं स्पष्टपणे नाकारलं आहे.
अनेक हिंदुत्ववादी नेत्यांनी डॉ. मेघा आणि तिच्या कुटुंबीयांना हे लग्न करू नये हे पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी श्री वज्रदेही मठाचे श्री राजशेखरानंद स्वामीजी यांनामध्ये आणलं. श्री राजशेखरानंद स्वामीजी यांनी डॉ. मेघा आणि तिच्या पालकांची नुकतीच भेट घेतली आणि तासभर त्यांच्याशी चर्चा केली. वेगळ्या धर्मातल्या पुरुषाशी लग्न केल्यास डॉ. मेघा यांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, हे त्यांनी तपशीलवार सांगितलं. ‘अशा चुकीच्या निर्णयांमुळे ज्या महिलांना त्रास सहन करावा लागला त्याची अनेक उदाहरणं आम्ही तिला दिली आहेत. आम्ही जे बोललो ते तिला पटलं असावं, असं वाटत आहे,’ असं स्वामीजींनी म्हटलं आहे.
डॉ. मेघा यांचे वडील मोहन यांनी सांगितलं, की ‘आम्ही त्या मुलाच्या म्हणजे डॉक्टर जाफर याच्या कुटुंबाला भेटलो आहोत. ते अत्यंत सुसंस्कृत कुटुंब असून, ते चांगलं कुटुंब आहेत. त्यांना धर्माचा काही प्रश्न नाही. आमच्या मुलीला धर्मांतराची गरज नाही आणि ती तिचा धर्म पाळू शकते, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. या लग्नात आम्हाला कोणतीही अडचण नाही. खरं तर, आम्ही आनंदाने आमच्या मुलीच्या लग्नाची तयारी करत आहोत.’ या सगळ्या प्रकारामुळे दोन्ही कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुलीच्या निर्णयाला तिच्या पालकांचा पूर्ण पाठिंबा असल्यानं त्यांनी हे लग्न रद्द न करता पुढं ढकललं आहे. आता हे लग्न नियोजित तारखेला न करता वेगळ्या दिवशी करण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबांनी घेतला आहे.