धरणगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात आवश्यक त्या ठिकाणी मागणीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र मंजूर होणार आहे. आरोग्य क्षेत्रातील या चांगल्या सुविधा खेड्या-पाड्यापर्यंत आणि तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. ‘सामान्य माणसांचा विचार करता “आपला दवाखाना ” ही संकल्पना सर्व सामान्यांसाठी महत्वपूर्ण ठरणार असून “आपला दवाखाना” या आरोग्य सेवेचा ग्रामीण भागासह शहरालाही फायदा होईल असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव येथे नगरपालिकेच्या रुग्णालयात बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना”च्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया हे होते.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ग्रामीण – शहरी भागातील गरजू रुग्णांसाठी मोफत तपासणी उपचार मार्गदर्शन व्हावे याकरिता हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा शुभारंभ महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात 317 तर जिल्ह्यात 14 ठिकाणी सुरू करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे गतिमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.श्री. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन प्रणालीद्वारा नुकताच संपन्न झाला असून जळगाव जिल्ह्यातही आपला दवाखान्याची सुरुवात धरणगाव शहरातील नगरपालिकेच्या रुग्णालय येथे राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते विशेष कार्यक्रमाद्वारे करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील, प्रभारी तहसीलदार लक्ष्मण सातपुते, माजी पंचायत समिती सभापती मुकुंद नन्नवरे, मोतीआप्पा पाटील, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, मुख्याधिकारी जनार्दन पवार,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. पंकज शिंपी, जिल्हा आरोग्य समन्वय समितीचे सदस्य मुकुंद गोसावी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील, अॅड. संजय महाजन, गटनेते पप्पू भावे, चर्मकार समाज कार्याध्यक्ष भानुदास विसावे, विजय महाजन, वासुदेव चौधरी, शिरीष बयस, वाल्मिक पाटील, विलास महाजन, दिलीप महाजन, अॅड. कन्हैय्या रायपूरकर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे यांनी केले. जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” या योजने बाबत विस्तृत माहिती विशद करून जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासन तत्पर असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्याभरात 14 तालुक्यांमध्ये या योजनेंतर्गत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू होत असल्याचे सांगून ग्रामीणसह शहरी भागातील रुग्णांनी या आरोग्य सेवेचा फायदा घ्यावा असे आवाहन केले. शासकीय व जिल्हा सामान्य रुग्णालय द्वारा शहरातील बांधकाम सुरू असलेले सुसज्ज अत्याधुनिक माता महिला बाल रुग्णालय ( MCH Wing ) मोहाडी येथे सुरू असलेले भव्य रुग्णालय याबाबतही माहिती दिली. व्याधीमुक्त जीवनासाठी सर्वांगीण आरोग्य महत्त्वाचे असून नागरिकांच्या आरोग्य सेवेंसाठी आपण सदैव तत्पर आहोत. आरोग्य सेवा ईश्वरीयकार्य असल्याने निस्वार्थ निरपेक्ष भावनेने सेवा कार्य केल्यास त्याची समाजही नोंद घेतो व आपल्याला आनंद आत्मीय बळ मिळते असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन रक्तकर्ण मुकुंद गोसावी यांनी तर आभार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी मांडले.