धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी बु. येथे कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्यांवर छापा टाकून सुटका केल्याची घटना दि. ५ फेब्रुवारी रोजी घडली होती. याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या पशुधनाचा ताबा मिळण्यासाठी शेख इम्तियाज याने न्यायालयात अर्ज केला होता. त्या अर्जावर हरकत घेतल्यानंतर न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला आहे.
पाळधी बु. येथील शेख इम्तियाज शेख अय्याज कुरेशी रा. कुरेशी मोहल्ला याच्या घराजववळ कत्तलीसाठी गो-वंश बांधलेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी कारवाई करीत तेथून ६ गोवंश ताब्यात घेतले. तसेच शेख इम्तियाज याच्या घराची पाहणी केली असता, तेथून कत्तीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी शेख इम्तियाज शेख अय्याज कुरेशी याच्याविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तसेच जप्त केलेले ६ गोवंशांना संगोपनासाठी श्री. साई सेवा समिती चॅरीटेबल ट्रस्ट पाळधी येथे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शेख इम्तियाज शेख अय्याज कुरेशी याने ६ गोवंशांचा ताबा मिळण्यासाठी धरणगाव येथील न्यायालयात अर्ज दाखल केला.
त्रयस्थ इसम म्हणून श्री. साई सेवा समिती चॅरीटेबल ट्रस्टतर्फे अॅड. राहूल एस. पारेख, अॅड. संजय सी. महाजन अॅड. रिषभ एस. शुक्ला तर वि.हिं.प. धरणगाव तालुका अध्यक्ष श्रीपाद पांडे, बजरंग दल तालुका अध्यक्ष आकर्ष तिवारी व बजरंग दल जिल्हा उपाध्यक्ष प्रथम सुर्यवंशी यांनी त्यांचे वकील अॅड. अजिंक्य ए. काळे व अॅड. आकाश एन. महाजन यांनी, सदर गोवंशांचा ताबा हा शेख इम्तियाज याला देण्यात येवू नये म्हणून लेखी हरकत घेतली. त्यानंतर न्यायालयाने दि. २० मे रोजी शेख इम्तियाज शेख अय्याज कुरेशी याचा गोवंश परत मिळण्याचा अर्ज फेटाळून लावला.