कन्नड (वृत्तसंस्था) एका गाईनं चुकून सोनसाखळी गिळल्याची घटना घडली. एका कुटुंबाने गायीला छान सजवलं, तिला नैवेद्य दाखवला. शिवाय तिला सोन्या चांदीचे अलंकारही घातले. मात्र या गायीनं अन्न खाण्याऐवजी २० ग्रॅम सोनसाखळी गिळली. तब्बल ३५ दिवस हे सोनं किमान शेणावाटे तरी बाहेर पडेल अशी वाट हे कुटुंब पाहात होतं. परंतु तसं झालं नाही. शेवटी पशु वैद्यकीय डॉक्टरांच्या मदतीने सोनसाखळी परत मिळाली.
हा चकित करणारा प्रकार उत्तर कन्नड जिल्ह्यातील सिरसी तालुक्याच्या हिपनहल्ली या गावात घडला. या ठिकाणी गायीची मनोभावे पुजा केली जाते. गाईला हार आणि रंगीबेरंगी फुलांनी सजवलं जातं. काही लोक गायीला लक्ष्मीचं रुप मानतात. त्यामुळं ते गायींना सोन्याच्या दागिन्यांनी सजवतात, पूजा करतात, त्यांना चांगले पदार्थ खाऊ घालतात आणि नंतर दागिने परत घेतात. गावातील हेगडे कुटुंबीयांनी देखील अशाच प्रकारे गायीची मनोभावे सेवा केली. मात्र ही सेवा करत असताना त्यांनी एक लहानशी चूक केली. त्यांनी आपली एक २० ग्रॅमची सोन्याची चैन गायीच्या तोंडात ठेवली. असं केल्यामुळे सोनं, संपत्ती वाढते असा समज येथील लोकांचा आहे. मात्र गायीनं चूकून ती साखळी गिळली.
ही घटना घडल्यानंतर पुढे ३०-३५ दिवस रोज हेगडे कुटुंबीय गायीच्या शेणात साखळीचा शोध घेत होते. परंतु त्यांना सोनं काही मिळालं नाही. अखेर शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी पशु वैद्यकीय डॉक्टरांची मदत घेतली. सुरुवातीला हा प्रकार पाहून डॉक्टरही चक्रावले. पण त्यांनी मेटल डिटेक्टर वापरून गायीच्या पोटात साखळी आहे की नाही, याची तपासणी केली. त्यानंतर गायीवर शस्त्रक्रिया करून सोन्याची साखळी काढण्यात आली. सोनसाखळी काढल्यानंतर त्याचं वजन केलं असता ते फक्त १८ ग्रॅम निघालं. तसेच साखळी मोडलेली देखील आहे. त्यामुळे २ ग्रॅम सोनं गहाळ जरी झालं असलं तरी किमान साखळी तरी मिळाली याचा आनंद कुटुंबीयांना आहे.