इंदोर (वृत्तसंस्था) देशात महिलांविरोधी अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. तसेच अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याच्या बाबतीत तर नराधमांनी क्रूरतेचा कळस गाठला आहे. अशातच आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील इंदोर येथे एका १८ वर्षाच्या मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला आणि नंतर तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींचा तरुणीला जाळण्याचा कट अयशस्वी ठरला.
याबाबत इंदोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कोचिंग क्लासहून घरी परतत असताना ही धक्कादायक घटना घडली. रात्री ९ वाजताच्या सुमारास नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. नंतर आरोपींनी तिला चाकूने मारले आणि त्यानंतर तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान पीडित तरुणीने आरडाओरडा केल्याने तेथे काही लोक जमले. त्यामुळे आरोपींनी घटनास्थळाहून पळ काढला.
नेमकं प्रकरण काय आहे
इंदोरच्या भागीरथपूर परिसरात रेल्वे रुळानजीक दोन नराधमांनी पीडित तरुणीशी जबरदस्ती केली. त्यानंतर आणखी तीनजण तेथे आले आणि त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिची प्रकृती स्थिर असून पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. इंदोर पोलीस याप्रकरणी जबाब नोंद करत असून याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.