काबुल (वृत्तसंस्था) अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती कशी भयावह बनत आहे, हे दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. मिळेल त्या मार्गाने नागरिकांना देशातून म्हणजेच तालिबान्यांच्या तावडीतून बाहेर पडायचं आहे. यातूनच विमानाला लटकून प्रवास करण्याच्या प्रयत्नात हवेतून खाली पडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
उडत्या विमानातून लोक पडत असल्याचा व्हिडिओ अफगाणिस्तानच्या राजधानीतून समोर आला आहे. यामध्ये एका पाठोपाठ एक तीन जण विमानातून पडताना दिसून येत आहेत. स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे, कुठल्याही परिस्थितीत देश सोडण्याच्या नादात हे लोक अमेरिकेच्या लष्करी विमानावर चढले होते. तसेच विमानाच्या टायरच्या जागेत लपून बसले होते. पण, काबूल विमानतळावरून जेव्हा या विमानाने उड्डान घेतले आणि विमान आपल्या वेगात आले तेव्हा एकानंतर एक तिघेही खाली पडले.
अफगाणिस्तानच्या विमानतळावर सध्या इतकी गर्दी पाहायला मिळते जणू ते विमानतळ नसून बस स्टँड आहे. आपल्या जीवासमोर सामानाची काय चिंता. आपले सर्वस्व सोडून हजारोंच्या संख्येने लोक विमानतळ गाठत आहेत. जिथे जागा मिळेल तिथे बसावे असे चित्र आहे. राजधानीत लोकांना आपले मोबाईल रिचार्ज सुद्धा करता येत नाही. तर काही लोक आपले कॉल बॅलेन्स आणि इंटरनेट जीवन मरणाच्या परिस्थितीसाठी राखून ठेवत आहेत.