नांदेड (वृत्तसंस्था) डुकरांच्या कळपाने लचके तोडल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी शासकीय रुग्णालय परिसरात घडली. जैवकचरा खाऊन हिंसक झालेल्या डुकरांच्या झुंडीने यापूर्वीही रुग्णालयात नातेवाईक आणि लहान मुलांवर हल्ले केले आहेत. तुकाराम नागोराव कसबे गेले (वय ३५, रा.धनगरवाडी), असे मयत तरुणाचे नाव आहे.
तुकाराम कसबे या तरुणाला अनेक हा वर्षांपासून टीबीचा आजार होता. त्याच्यावर विविध रुग्णालयात उपचार करण्यात आले. परंतु तब्येतीत सुधार न झाल्याने ३० ऑक्टोबर रोजी विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचार घेतल्यानंतर तो बराही झाला. ९ नोव्हेंबर रोजी त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्याचे वडील नागोराव कसबे हे त्याला धनगरवाडीला परत घेऊन गेले होते.
दि. १० नोव्हेंबर रोजी तुकाराम हा परभणीतील काकाकडे जायचे म्हणत होता. त्याला त्या दिवशी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास वडिलांनी नांदेड रेल्वे स्टेशनवर सोडले होते. परंतु तो परभणीला ना जाता परत विष्णुपुरी येथील रुग्णालयात गेला. तेथे रुग्णांच्या नातेवाइकांसाठी असलेले जेवणही त्याने केले. त्यानंतर परिसरातील चिंचेच्या झाडाखाली झोपला. रात्री डुकरांच्या झुंडीने त्याच्यावर हल्ला केला. त्यात तुकारामच्या दोन्ही गालाचे, नाकाचे आणि कमरेखालच्या भागाचे लचके तोडण्यात आले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी काही रुग्णाच्या नातेवाईकांना तुकरामचा मृतदेह चिन्नविन्न अवस्थेत आढळून आला.
दरम्यान, मयत व्यक्तीच्या शरीरावर जखमा मृत्यूनंतर झाल्या आहेत. त्या जखमांचा मृत्यूशी संबंध नसल्याचे आढळले आहे. मृत्यूचे अंतिम कारण समजण्यासाठी व्हीसेरा हा केमिकल अॅनॅलेसीस व व्हीस्टो पॅथॉलॉजी तपासणीसाठी राखून ठेवल्याचे मेडीकल कॉलेज प्रशासनाने शनिवारी रात्री स्पष्टीकरण दिले आहे.