पाळधी/धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत २३ पैकी १५ नगरसेवक निवडून येत शिवसेना–भाजपा युतीला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही, नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर राजकीय अहंकार न दाखवता विकास आणि समन्वयाचा सकारात्मक संदेश देणारी घडामोड घडली आहे.
शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आलेल्या नगराध्यक्षा सौ. लिलाबाई सुरेश चौधरी तसेच त्यांच्या सोबत निवडून आलेल्या आठ नगरसेवकांनी पालकमंत्री तथा राज्याचे शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पालकमंत्र्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करत अभिनंदन केले.
विशेष म्हणजे, नगरपरिषदेवर शिवसेना–भाजपा युतीचे स्पष्ट बहुमत असतानाही नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर कोणतीही राजकीय कटुता न ठेवता शहरहिताला अग्रक्रम देत ही भेट झाली, ही बाब धरणगावच्या राजकीय परिपक्वतेचे उदाहरण मानली जात आहे.
नवनिर्वाचित नगराध्यक्षा लिलाबाई चौधरी यांचे पती सुरेश चौधरी उर्फ नाना व सुपुत्र निलेश चौधरी हे पूर्वी शिवसेनेत सक्रिय होते. सुरेश चौधरी हे पालकमंत्र्यांचे जुने मित्र असून दोघांमध्ये जिव्हाळ्याचे पारिवारिक संबंध आहेत. यापूर्वी निलेश चौधरी यांना शिवसेनेत नगराध्यक्षपदाची संधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीच दिली होती.
निवडणुकी दरम्यान सर्वच गटांनी आपापल्या विचारांनुसार काम केले. मात्र निकालानंतर “विजय–पराभव नव्हे, तर शहराचा विकास महत्त्वाचा व शहराची एकजूट” या भूमिकेवरून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी एकत्र असले पाहिजे.
गुलाबराव पाटील हे नेहमीच विकासकेंद्री, समन्वय साधणाऱ्या आणि सकारात्मक राजकारणासाठी ओळखले जातात. बहुमत असूनही विरोधी सूर न धरता, सर्वांना सोबत घेऊन विकासाची दिशा ठरवण्याची त्यांची भूमिका राज्यभरातील कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींसाठी आदर्श ठरत आहे.















