मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना “आनंदाचा शिधा” संचाचे वितरण २२ मार्च २०२३ पासून पुढील एक महिनाभर सुरु राहणार आहे, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब, औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा, अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील एपीएल (केशरी) शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सणांनिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर व १ लिटर खाद्यतेल या ४ शिधा जिन्नसांचा समावेश असलेला “आनंदाचा शिधा” संच उपलब्ध करुन देण्याचा निर्णय २२ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. त्यानुसार काही जिल्ह्यांत वितरण सुरू झाले आहे.