जळगाव (प्रतिनिधी) ट्रक बाजूला उभा करून त्याखाली क्लिनर झोपला होता. मात्र चालकाला ही बाब लक्षात आली नाही. त्यामुळे ट्रक चालू करून पुढे नेताच ट्रक खाली झोपलेला क्लिनर चिरडला गेला. दीपक विनोद मेढे (३८, रा. फैजपूर, ता. यावल), असे मयत क्लिनरचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.
यावल तालुक्यातील फैजपुर येथे दीपक मेढे हा वास्तव्यास होता. तो ट्रकवर क्लिनरचे काम करुन कुटुंबाला हातभार लावित होता. बुधवारी तो एमआयडीसीतील कंपनीत (एमएच १९ सीवाय २०१७ ) या क्रमांकाचा खांदेश फिलेरो येथे गव्हाचा ट्रक खाल करण्यासाठी आला होता. या ट्रकखाली दीपक मेढे हा झोपलेला असतांना ट्रक चालकाने ट्रक सुरु करुन तो जागेवरुन काढला. यावेळी ट्रकखाली झोपलेला दीपक मेढे हा चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ट्रक चालकासह परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. दीपकच्या पश्चात आई, वडील आहे.
गव्हाच्या पोत्यांनी भरलेला ट्रक हा दिपकच्या अंगावरुन गेल्याने त्यांच्या चेहऱ्याचा पूर्ण चेंदामेंदा झाला असून हात-पायदेखील तुटले होते. याप्रकरणी दीपकचा मावस भाऊ आतिष अरविंद मेढे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ट्रक चालक शेख मझहर शेख अख्तर रा. फैजपुर ता. यावल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.