चोपडा प्रतिनिधी – पंकज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा येथे दिनांक ०४ जानेवारी २०२५ रोजी मराठी विभागा मार्फत कवी आपल्या भेटीला या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. आर. अत्तरदे तर मार्गदर्शक मा. कविवर्य प्रभाकर शेळके हे उपस्थित होते. स्वागत व सत्काराने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ किशोर पाठक यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले की ,कवी मा प्रभाकर शेळके यांची गुलाबाची चंद्रकळा ही कविता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला वर्गाच्या मराठी विषयाला अभ्यासण्यासाठी आहे. तसेच त्यांच्या वेगवेगळ्या काव्यसंग्रहा विषयी माहिती दिली. मा. प्रभाकर शेळके यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, कवी आपल्या मनातील भावभावनांना शब्दाद्वारे वाट करून देत असतो. तसेच ग्रामीण जीवनातील शेतीभाती किंवा ग्रामीण जीवनाचे वास्तव असे वर्णन कवितेद्वारे करता येते. विद्यार्थ्यांनी कष्ट करण्याची तयारी ठेवली तर कोणतेही अशक्य वाटणारे काम सहज शक्य होत असते. अध्यक्षीय समारोपातून प्राचार्य डॉ. आर. आर. अत्तरदे यांनी सांगितले की, कविता ही कवीच्या अंतरंगातून निर्माण होत असते. समाजातील वास्तवतेचे दर्शन कवितेतून घडते. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ किशोर पाठक तर आभार डॉ अरुण मोरे यांनी मानले.