मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी- बारावी परीक्षांचे काय होणार याचा निकाल लांबणीवर गेला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज असल्याचे विभागाच्यावतीने पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले.
मात्र कोरोनामुळे राज्यभर लागलेले निर्बंध लक्षात घेता परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा विचार सुरू असून यासंदर्भातील अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली. तसेच नववी आणि अकरावीच्या परीक्षेबाबत बुधवारी निर्णय होणे अपेक्षित आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यावर शिक्षण विभाग ठाम आहे. कारण या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विविध मार्ग खुले होतात. आजच्या बैठकीत या मुद्दय़ावर चर्चा झाली, मात्र अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लागलेल्या नव्या नियमांमुळे दहावी-बारावीच्या परीक्षांविषयी पेच निर्माण झाला होता. त्यामुळे मंगळवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा आयोजनाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत दहावी-बारावी परीक्षेबाबत अद्याप चर्चा बाकी असल्याचे सांगण्यात आले, तर नववी आणि अकरावीचा निर्णय दोन दिवसांत घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
दहावी-बारावीची परीक्षा सध्या तरी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच
दहावी-बारावीची परीक्षा सध्या तरी नियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची सांगितले. मात्र येत्या काही काळात राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर झाल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मंत्रिमंडळाला शिक्षण मंडळाकडून सादरीकरण केले जाणार आहे. यानंतर राज्य सरकार परीक्षेविषयी अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.
एमपीएससी परीक्षा वेळापत्रकानुसारच
गेल्या वर्षभर सुरू असलेल्या कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांवरही झाला. गेल्या महिन्यात 21 मार्चला पार पडलेली एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेनंतर आता पुढील परीक्षांचे काय असा प्रश्न निर्माण झाला होता, तर काही विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचीही मागाणी केली होती. मात्र येत्या रविवार, ११ एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्वपरीक्षादेखील वेळापत्रकानुसार पार पडणार आहे. परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल नाही. योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन करून ही परीक्षा पार पाडली जाणार आहे असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
राज्यभरातून दहावीच्या परीक्षेला सुमारे १६ लाख तर बारावीच्या परीक्षेला १४ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे, तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मेदरम्यान होणार आहे. सध्याच्या निर्बंधानुसार ३० एप्रिलपर्यंत शनिवारी बारावीचा केवळ एकच पेपर आहे. राज्य सरकारने परीक्षार्थींना निर्बंधांतून सूट दिलेली आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाचा ऑफलाइन परीक्षा घेण्यावर भर आहे.















