मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यातच जर मुंबई लोकल ही सर्वसामान्य जनतेसाठी सुरु केली, तर त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला लोकल प्रवासासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सामान्यांसाठी पुन्हा सुरु करण्याबाबत विचार सुरु असल्याचे सांगितलं जात होतं. मात्र कोरोनाचा वाढता आकडा, लोकलमध्ये गर्दी, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे यांसह अनेक कारणामुळे लोकलचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय आणखी लांबणीवर पडणार आहे. कोरोनाचा वाढता आकडा पाहता मुंबईतील सर्व शाळा मात्र ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान मुंबईत काल कोरोनाचे १०९२ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १०५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या ९३२५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबईसाठी पुढील तीन ते चार आठवडे खूप महत्त्वाचे आहेत. सध्या तरी, मुंबईत कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात येणार नाही. तीन ते चार आठवड्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर निर्बंध लागू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.