जळगाव (सुरेश उज्जैनवाल) विश्वरत्न महामानव राष्ट्रनिर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कधी नव्हती एवढी अपरिहार्यता अलीकडे निर्माण झाली आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळातील आणि त्यानंतरच्या संविधान अस्तित्वात आल्या नंतर, खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची विदवत्ता आणि देशा प्रतीची प्रखर राष्ट्रभक्ती देशाने अनुभवली.
त्या कालखंडातील मूकनायक सध्याच्या वर्तमान काळात आमच्या राजकीय, सामाजिक अन सांस्कृतिक जगतात महानायक म्हणून “जयभीम,” “काला”, आर्टिकल 15, ” मसान”, “झुंड” आदी मधून भारतीय संविधानाच्या अरिहार्यतेची जाणिव जागृतीची आठवण करून देत चित्रपट रूपाने समता, न्याय विषयीचे एक वैचारिक वादळ निर्माण करत आहे. बाबासाहेबांच्या विचारांची पेरणी करणाऱ्या अलीकडच्या चित्रपटांची निर्मिती मागचा संदेश समजून घेण्यासह तो आचरणात आणण्यासाठी केलेला एक प्रयास म्हणता येईल. सुमारे शंभर वर्षांपूर्वी ‘ मुकनायकाने ‘ ज्यांना आवाज दिला, ते आता बोलू लागले नाहीत तर विषय ही मांडू लागले आहेत. चित्रपटाच्या माध्यमातून ‘मुकनायकाचा’ राष्ट्र, समाज रुपी समतेचा मानवीय किरदार प्रत्येकाच्या अंतर्मनाचा ठळकपणे ठाव घेत चर्चिला जात आहे.
जस जसा काळ पुढे जात आहे, तस तसं बाबासाहेब भारतीय समाजासाठी विशेषतः दलित, बहूजन आणि अल्प संख्याकांसाठी प्रभावी प्रेरणास्त्रोत ठरत आहे. हे या शतकातील वैशिष्ट्य आहे. बाबासाहेबांच्या जीवन चारित्र्यावर काढण्यात येणारे चित्रपट, हा त्याचाच परिपाक म्हणता येईल. त्यांच्यावर अनेक चित्रपट निर्माण केले जात आहेत. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आप आपल्या परीने बाबासाहेबांना दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, करीत आहेत. बाबासाहेबांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी कलाकारांनी ही तेवढ्याच धाडसाने आणि जीव ओतून स्क्रीनवर बाबासाहेब जिवंत केला आहे, हे विशेष !
पहिले पाऊल महाराष्ट्राचे…..
महामानव बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण नंतर देशात सर्वात आधी सन 1968 मध्ये महाराष्ट्र शासनाने ” महापुरुष बाबासाहेब” या टायटलने मराठी भाषेतील लघुपटाची निर्मिती केली होती. 18 मिनिटांच्या या लघुपटाचे दिग्दर्शन नामदेव व्हटकर यांनी केले होते. अलीकडे प्रदर्शीत झालेल्या ” जयभीम” या तेलगू चित्रपटाने देशातील बाबासाहेबांचे अनुयायी आणि समाज परिवर्तनाच्या लढ्यातील लोकांचे लक्ष्य वेधून घेतले, तत्पूर्वी सन 2000 मध्ये डॉ जब्बार पटेलद्वारा दिगदर्शित बाबासाहेब आंबेडकर : अन टोल्ड ट्रुथ… हा इंग्रजी भाषेतील एक उत्कृष्ट चित्रपट होता. यात कन्नड अभिनेते मांमुट्टी यांनी बाबासाहेबांची व्यक्ती रेखा साकार केली होती आणि गुजराथी, हिंदी भाषेसह विविध भाषेत ती डब केली गेली.
… कभी हम बहुजन ,कभी हरिजन हो जाते है, सिर्फ जन नही बन पाते…!
आर्टिकल 15 या हिंदी चित्रपटा मधील हा संवाद दलितांची अवस्था अधोरेखित करणारं आहे, सत्तर वर्षा नंतर ही परिस्थिती बदलली नाही. संविधानास अभिप्रेत असलेली समता, बंधुता न्याय, पूर्णपणे मिळालेला नाही…हा संदेशच नव्हे काय? बाबासाहेबांनी संपूर्ण चळवळ, वैचारिक लिखाण, आरक्षण, धर्मांतर, समस्त मानव जातीच्या आत्मसन्मानासाठीचा संघर्ष, लढा आता चित्रपटाच्या माध्यमातून मांडला जातोय, थोडक्यात आता मूक नायक बोलू लागलंय, व्यक्त होतोय…. एका राष्ट्रीय महानायकाची कला माध्यमाने घेतलेली दखल, कालसापेक्षच नव्हे का?
इतिहास वो नही जो लिखा गया है
इतिहास वो भी नही,
जो तुमको पढ़ाया गया,
इतिहास वो है जो तुम्हारे बाप दादा ने सहा और जो लिखा ही नही गया..!”
सुरेश उज्जैनवाल,
ज्येष्ठ पत्रकार, जळगाव
8888889014