जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा परिषद निवडणुकांची प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातून गट व गण रचनेवर तब्बल १२१ हरकती आल्या होत्या. त्यांची विभागीय आयुक्तांकडे सुनावणी देखील घेण्यात आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील ८ हरकतींसह रावेरच्या ३ व सर्वाधिक चोपड्याच्या ३७ हरकती तत्वतः मान्य करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. आता हरकतींनंतर गट व गणांच्या गावांमध्ये काय बदल झाला आहे हे आज अंतिम गट-गण रचना अंतिम जाहिर केली जाणार आहे.
अडावद गट राहणार एकत्र
अडावद धानोरा या पुर्वीच्या गटातून अडावद येथील काही भाग वगळण्यात आला होता. मात्र हा गट आता २०१७ च्या गट रचनेनुसारच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आज अंतिम रचनेत काय बदल झाले आहे हे स्पष्ट होणार आहे.
मस्कावद खुर्द-सीम, बुर्दुक खुर्द आता एकाच गणात
रावेर तालुक्यातील मस्कावद गणातून सीम, खुर्द व बु. ही गावे वेगवेगळी करण्यात आली आहे. मात्र आता या गणात २०१७प्रमाणे ही गावे राहतील. चाळीगाव तालुक्यातील ईच्छापुर तांडाच्या आक्षेपाला देखील तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.
मुक्ताईनगरचा एक गट कमी
मुक्ताईनगर तालुक्यात या पुर्वीच्या २०१७ च्या निवडणुकीत ४ गट व ८ गण होते. मात्र नविन रचनेनुसार ३ गट व सहा गण होणार आहे. मुक्ताईनगरमध्ये ग्रामिणचा काही भाग नगरपंचायतीला जोडला गेला असल्याने येथे एक गट कमी झाल्याचे मानले जात आहे.