साकळी ता. यावल (वृत्तसंस्था) येथील विविध कार्यकारी सोसायटी व्यापारी संकुलाजवळील गटारीची योग्यप्रकारे स्वच्छता होत नसल्याने गटार अक्षरश: तुंबली असून गटारीचे पाणी थेट रस्त्यावर येत आहे. तुंबलेल्या गटारीमुळे डासांचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या गटारीतील पाण्याचा निचरा कायमस्वरूपी करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
याबाबत सविस्तर असे की, साकळी येथील नूतन विविध कार्यकारी व्यापारी संकुलाजवळील गटार पणीबाटल्या, प्लास्टिक पिशव्यांनी भरून तुंबून सांडपाणी रस्त्यावर येण्याचा प्रकार नियमित घडत असतो. त्यामुळे दुकानासमोर गटारीतील कचरा साचत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. या समस्ये मुळे व्यापारी संकुलातील दुकान धारकांना व ग्राहकांना दुकानात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. सदर गटार तुंबून सांडपाणी रस्त्यावर येण्याच्या प्रकाराबाबत ग्रामपंचायत ला वारंवार तक्रार केली असूनही सांडपाण्याचे योग्य नियोजन करण्यात येत नसल्याचे दुकानदारांनी द क्लियर न्यूज च्या प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले. सदर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडून त्वरित लक्ष देऊन याठिकाणी नवीन गटारीची बांधकाम करण्यात यावे व आमची समस्या सोडवावी अशी मागणी दुकान धारकांकडून केली जात आहे.