मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी नवाब मलिक यांचा जबाब मागवला. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने मलिक यांना मंगळवारपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले. इतकेच नाही तर न्यायालयाने मलिक यांना फटकारले आणि तुम्ही ट्विटरवर उत्तर देऊ शकता तर तुम्ही येथेही उत्तर देऊ शकता, असेही म्हटले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी नवाब मलिक यांना समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने मलिकांना मंगळवारपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. “नवाब मलिक तुम्ही उद्यापर्यंत तुमचे उत्तर दाखल करा. तुम्ही ट्विटरवर उत्तर देऊ शकत असाल तर तुम्ही इथेही (कोर्टात) उत्तर देऊ शकता,” असे न्यायमूर्ती जामदार म्हणाले. दरम्यान, कोर्टाने नवाब मलिक यांना तक्रारदार ज्ञानदेव वानखेडे यांच्याविरुद्ध आणखी कोणतेही विधान करण्यापासून रोखणारा कोणताही आदेश दिलेला नाही.
ज्ञानदेव वानखेडे यांची बाजू मांडणारे वकील अर्शद शेख यांनी न्यायालयाला सांगितले की, नवाब मलिक यांच्याकडून दररोज काही खोटे आणि बदनामीकारक विधान केले जात आहेत, ज्यामुळे सोशल मीडियावर वानखेडे कुटुंबीयांबद्दल आणखी बदनामीकारक वक्तव्ये केली जात आहेत. “आज सकाळीच मलिक यांनी समीर वानखेडेंच्या मेहुणीबद्दल एक ट्विट पोस्ट केले आहे. तसेच किमान या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत न्यायालयाने एकतर मलिक यांना ज्ञानदेव वानखेडे यांच्या कुटुंबाबद्दल विधाने करण्यापासून रोखावे,” अशी मागणी अर्शद शेख यांनी केली.
नवाब मलिक यांचे वकील अतुल दामले यांनी दाव्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागताना न्यायालयाला सांगितले की, “ज्ञानदेव वानखेडे आपल्या सज्ञान मुलांच्या वतीने बोलू शकत नाही आणि इतर व्यक्तींनी सोशल मीडियावर काय टिप्पणी केली आहे, याचा दोष मलिकांना देता येणार नाही.”















