नाशिक (वृत्तसंस्था) डॉक्टर महिलेची पती आणि सासऱ्याने संगनमताने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन आठवड्यांपूर्वी हत्या करुन अपघात असल्याचा बनाव बाप-लेकाने रचला होता. डॉ. भाग्यश्री किशोर शेवाळे (वय २७ वर्ष, राहणार न्यायडोंगरी) असे मयत महिलेचे नाव आहे.
न्यायडोंगरी येथील डॉक्टर भाग्यश्री किशोर शेवाळे यांचा अपघाती मृत्यू झाला नसून, त्यांची पतीसह सासऱ्याने दगडाने ठेचून हत्या केल्याचा गुन्हा नांदगाव पोलिसांत दाखल करण्यात आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाग्यश्री यांचा पती डॉ. किशोर नंदू शेवाळे व त्याचे वडील नंदू राघो शेवाळे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे अपघाताचा बनाव उघडकीस आला असून, तब्बल १५ दिवसांनी खुनास वाचा फुटली आहे.
दि. २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६.३० ते रात्री ११ वाजेच्या दरम्यान मन्याड फाटा या ठिकाणी दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात डॉ. भाग्यश्री मृत्युमुखी पडल्याची माहिती तिचा पती डॉ. किशोर शेवाळे याने चाळीसगाव पोलिसांना दिली होती. चाळीसगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत हा गुन्हा नांदगाव पोलिसांकडे वर्ग केला होता.
या घटनेनंतर १५ दिवसांनी डॉ. भाग्यश्री यांचे बंधू सचिन कैलास साळुंखे (रा. तितरखेडा ता. वैजापूर) यांनी नांदगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत नमूद केल्यानुसार, डॉ. भाग्यश्री यांचा त्यांचे पती डॉ. किशोर शेवाळे व सासरे नंदू शेवाळे नेहमी छळ करीत असत. दवाखाना बांधण्यासाठी माहेराहून २५ लाख रुपये आणण्याची नेहमी मागणी केली जात असे. ही मागणी पूर्ण झाली नाही म्हणून बापलेकाने संगनमताने डॉ. भाग्यश्रीची हत्या केली. अपघाताचा बनाव करीत डॉ. भाग्यश्रीला काचेच्या बाटलीने मारत तिला दगडाने ठेचले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी डॉ. किशोर व नंदू शेवाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात केला असून, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगावचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, उपनिरीक्षक नितीन खंडागळे, मनोज वाघमारे, संतोष बहाकर तपास करीत आहेत.