सातारा (वृत्तसंस्था) साताऱ्यातील कराड (Karad area of Satara district) येथे एका पाच वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने चिमुकल्याची मान पकडून त्याला पळवून नेताना मुलाच्या वडिलांनी त्याला रोखलं आणि अक्षरश: बिबट्याशी झुंज केली. मुलाच्या वडिलांनी प्रसंगावधान दाखवून बिबट्याचा प्रतिकार करत मुलाचे प्राण वाचवले. या धाडसाबद्दल पंचक्रोशीत धनंजय देवकर यांची चर्चा होत आहे.
काय घडलं नेमकं?
याबाबत घटनास्थळी जमलेले नागरिक तसेच वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, किरपे येथील शेतकरी धनंजय देवकर हे गुरुवारी सायंकाळी आपल्या शेतात काम करत होते. त्यांचा पाच वर्षीय मुलगा राजही सोबत होता. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास धनंजय देवकर हे शेतीची कामे उरकून घरी जाण्याची तयारी करत होते. त्यांनी शेती अवजारांची आवराआवर सुरू केली. साहित्य (कैची) पिशवीत भरून ठेवताना त्यांचा लहान मुलगा राज मदत करत होता. तो खाली वाकून अवजार उचलून देत असताना बाजूच्या शेतातून आलेल्या बिबट्याने अचानक राज देवकरवर हल्ला केला. बिबट्याने त्याच्या मानेला पकडून ओढून उसाच्या शेतात नेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी राजचे वडील धनंजय देवकर यांनी प्रसंगावधान दाखवत अतिशय धैर्याने आपल्या मुलाचे पाय घट्टपणे पकडून त्याला बिबट्याच्या तोंडातून सोडवण्यासाठी ओढू लागले. तसेच मदतीसाठी त्यांनी आरडाओरडाही केला. या झटापटीत शेतालगत असलेल्या तारेच्या कुंपनाला बिबट्या धडकला त्यामुळे त्याची पकडही सैल झाली आणि त्याला मुलाला उसाच्या शेतात ओढून नेता आले नाही. त्यामुळे बिबट्याने मुलाला तेथेच सोडले. ही संधी साधून तत्काळ धनंजय देवकर यांनी मुलाला उचलून घेतले. त्यानंतर बिबट्याने उसाच्या शेतात धूम ठोकली.
मानेत खोलवर रुतले दात
आपला मुलगा राज देवकर याचे प्राण वाचवण्यात वडील धनंजय देवकर यांना यश आले. परंतु, या हल्ल्यात राज देवकर गंभीर जखमी झाला. त्याच्या मानेला व कानाला बिबट्याचे दोन दात जोरात लागले आहेत. तसेच त्याच्या पाठीवर व पायावरही किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यानंतर धनंजय देवकर व ग्रामस्थांनी त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवले असून तेथे त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.















