जळगाव (प्रतिनिधी) वाघ नगर परिसरातील पंचशील सोसायटीत राहणाऱ्या एका सेवानिवृत्त वृद्धाचे बंद घर फोडून घरातून ६० हजार रूपयांची रोकड आणि चांदीच्या देवांच्या मूर्ती असा एकूण ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी नेल्याची घटना बुधवारी ९ जुलै रोजी रात्री ८ वाजता समोर आली आहे. या संदर्भात गुरुवारी १० जुलै रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघ नगर परिसरातील पंचशील सोसायटीत अनिल नामदेव विश्वे (वय-६५) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. दरम्यान २७ जूनपासून त्यांचे घर बंद होते. दरम्यान हे घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून ६० हजार रुपयांची रोकड आणि ५ हजार रुपये किंमतीचे चांदीच्या देवांच्या मुर्त्या असा एकूण ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना बुधवारी ९ जुलै रोजी रात्री ८ वाजता ते घरी आले. त्यावेळी घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी जळगाव तालुका पोलीसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील हे करीत आहे.