धुळे (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरकुंड शिवारात दहशत निर्माण केलेल्या नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाचा उपचारादरम्यान बालकाचा मृत्यू झाला आहे. रमेश नानसिंग डुडवे (वय १०), असे मयत बालकाचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत तीन बालकांचा बळी घेतला आहे.
झोपेतच उचलून नेले बालकाला !
मोघण ता. धुळे रमेश शिवारात धुडकु संपत माळी घेवुन यांच्या शेतात जागल्या म्हणुन काम करणारे नानसिंग जल्या डुडवे मूळ (रा. मालवन ता. वरला जि. बडवानी) यांचे कुटुंब दि. २५ रोजी रात्री जेवण आटोपुन शेतातील झोपडीत झोपले होते. दि. २६ रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास घरातील महिला शेती कामासाठी जायचे असल्याने लवकर उठून झोपडीजवळील रिकाम्या जागेत स्वयंपाक करत असतांना रमेश नानसिंग डुडवे (वय १०) हा झोपलेला होता. त्यावेळी समोरुन अचानक बिबट्या पळत आला व त्याने रमेशच्या मानेला पकडत उचलून नेले. त्यामुळे रमेशच्या आईसह इतर नातेवाइकही बिबट्याच्या मागे धाव घेत आरडा-ओरड केली. यामुळे बिबट्या रमेश यास नाल्यात सोडून पळून गेला.
उपचारादरम्यान रमेशचा मृत्यू !
बिबट्याच्या हल्ल्यात रमेश गंभीर जखमी झाला होता. त्याला आजुबाजूच्या शेतकऱ्यांच्या मदतीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले. रमेश पाच दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता. रमेशच्या तोंडाच्या बाजूलाच अधिक चावा बिबट्याने घेतला होता. हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात त्यांच्यावर डॉ. हेमंत चौधरी यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने उपचार केलेत. परंतू दुर्दैवाने त्यांना यश आले नाही. शनिवार (दि. २९) सकाळी ९.३० वाजता उपचारादरम्यान रमेशचा मृत्यू झाला. दरम्यान, बिबट्याने पाच दिवसांत एका मागोमाग तीन बालकांवर हल्ला चढवला. त्यात दीदी, स्वामीनंतर रमेशही बिबट्याचा बळी ठरला आहे. याप्रकरणी नानसिंग डुडवे यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत घेतले तीन बालकांचे बळी !
यापूर्वी नरभक्षक बिबट्याने नंदाळे बुद्रुक येथील ८ महिन्याची दिदि शिवराम पावरा व बोरकुंड येथील हार्दिक दीपक रोकडे (वय ५) या दोघांचा बळी घेतला आहे. आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. मानवी रक्ताची चटक लागलेल्या बिबट्याने बोरी परिसरात धुमाकूळ घातला असून त्याची दहशत निर्माण झाली आहे. या घटनांमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भिती निर्माण झाली आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत. वन विभागाने बिबट्याच्या शोधासाठी दिवसरात्र ५० कर्मचाऱ्यांचे पथक तैनात केले असून पिंजरे, ट्रप कॅमेरे, ड्रोनची मदत घेण्यात येत आहे. मात्र, बिबट्या अद्यापही मोकाट आहे.