जळगाव (प्रतिनिधी) जळगाव एमआयडीसी पोलिसांनी शासकीय महिला रुग्णालय इमारतीसाठी सुरू असलेल्या बांधकाम स्थळावरून एक लाख 27 हजारांचे साहित्य लांबवणार्या चोरट्यांना अटक केली आहे.
जळगाव शहरात मोहाडी रस्त्यावर महिला रुग्णालयासाठी बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या साईटवरून साहित्याची चोरी झाली होती. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना साहित्य चोरी ही सतबीरसिंग बलवंतसिंग टाक (रा. शिरसोली नाका, तांबापुरा, जळगाव), गुरुजितसिंग सुजाणसिंग बावरी (रा. शिरसोली नाका, तांबापुरा, जळगाव) आणि तंजीम बेग नसीम बेग मिर्झा (रा. टिपू सुलतान चौक, तांबापुरा, जळगाव) यांनी केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. संशयिताना अटक करण्यात आल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ठेकेदार आयुष कमलकिशोर मणियार यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
97 हजारांचे साहित्य जप्त
अटकेतील आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली तर 97 हजार रुपये किंमतीचे बांधकाम साहित्य हस्तगत करण्यात आले. याशिवाय त्यांनी गुन्हयात वापरलेली रिक्षा आणि मोटारसायकल देखील हस्तगत करण्यात आली. अटकेतील गुरुजीतसिंग सुजाणसिंग बावरी याने अयोध्या नगरातील रहिवासी नरेंद्र मानसिंग पाटील यांच्याकडे गेल्या वर्षी घरफोडी केल्याची कबुली दिली. एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल हा गुन्हा देखील उघडकीस आला आहे. अटकेतील सतबिरसिंग याच्याविरुद्ध यापुर्वी चोरी – घरफोडीचे 19, गुरजितसिंग याच्याविरुद्ध 11 आणि तंजीम बेग मिर्झा याच्याविरुद्ध 3 गुन्हे दाखल आहेत. अटकेतील तिघेही एमआयडीसी पोलिसांच्या अभिलेख्यावरील अट्टल गुन्हेगार आहेत.
यांनी आवळल्या मुसक्या
एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, हवालदार रामकृष्ण पाटील, सचिन मुंढे, किशोर पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, मुकेश पाटील, विशाल कोळी, राहुल रगडे, किरण पाटील, छगन तायडे, ललीत नारखेडे, साईनाथ मुंढे आदींनी ही कारवाई केली.