चोपडा (प्रतिनिधी) संविधानिक अधिकार असून सुद्धा शासन प्रशासनाकडून वर्षानुवर्षापासून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्रातील कोळी महादेव, डोंगर कोळी, मल्हार कोळी, ढोर व टोकरे कोळी या अनुसूचित जमातीच्या न्याय व हक्कांसाठी आदिवासी कोळी जमातीच्या राज्यव्यापी महाआंदोलनाची पहिली नियोजन सभा छत्रपती संभाजीनगरच्या भारतरत्न डॉ. मौलाना अब्दुल कलाम आझाद सभागृहात प्रचंड उत्साहात संपन्न झाली. सभेचे आयोजन आदिवासी कोळी समाज समन्वय समितीचे मुख्य समन्वयक अॅड. शरदचंद्र जाधव, प्रभारी अध्यक्ष सखाराम बिऱ्हाडे यांनी केलेले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी चोपडा म. वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (जळगाव) हे होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर जेष्ठ समाजसेवक किसन ठोंबरे, गोरक्षनाथ कोळी, जयवंतराव पोकळे, भगवान भानजी, सखाराम बिऱ्हाडे, मंगलाताई सोनवणे, रामचंद्र सपकाळे, गोपीचंद कोळी यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक सभेचे निमंत्रक अॅड. शरदचंद्र जाधव यांनी केले.
ह्या राज्यव्यापी महाआंदोलनाच्या शिस्तबद्ध नियोजनाविषयी विस्तृत चर्चा करून मंगळवार दि. २३ जानेवारी २०२४ पासून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर अन्नत्याग सत्याग्रह, ठिय्या आंदोलन, साखळी उपोषण, धरणे आंदोलन, रेलरोको, रास्तारोको, जेलभरो आंदोलन करण्याबाबतचा ठराव करण्यात आला. तसेच सर्व जिल्ह्यातील आंदोलनकर्त्यांचे प्रतिनिधित्व घेऊन सार्वमताने या समितीच्या प्रमुख अध्यक्ष पदावर अमळनेर चोपडा जळगाव येथील अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या सभेस महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाजबांधव शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभाकर बावस्कर, गणेश तायडे, आनंदा इंगळे, सुभाष पाडाळे, राजेंद्र जाधव, विजय सूर्यवंशी, योगेश सोनवणे, अनिताताई मुदीराज, डॉ.जाधव, शिवाजी चिंतलवाड, कैलास गवळे, विष्णू भोटकार, देवराज किन्नुर, मंगलाताई करजगावकर, विजेंद्र इंगळे यांचेसह आदिवासी कोळी समाज समन्वय समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रभावी सूत्रसंचलन अनिताताई मुदीराज तर आभार प्रदर्शन सखाराम बिऱ्हाडे यांनी केले. आयोजकांतर्फे उपस्थितांसाठी चहापाणी, नाश्ता, भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती.
















