अहमदनगर (वृत्तसंस्था) नराधम सासऱ्याचे आधी गर्भवती सुनेचा गळा आवळला, नंतर चिमुकल्या नातीला पाण्यात बुडवून खून केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मजलेशहर गावात घडली आहे. संतापजनक म्हणजे सुनेने शरीर सुखाची मागणी पूर्ण न केल्यामुळे सासऱ्याने दोघांचा खून केल्याचे समोर आले आहे. कारभारी ज्ञानदेव लोढे (वय ६२ वर्ष, रा. मजलेशहर) असं नराधम सासऱ्याचं नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
ऋतुजा संतोष लोढे (वय २२ वर्ष) व समृद्धी संतोष लोढे (वय २ वर्ष) यांचा खून झाला आहे. हृदयद्रावक म्हणजे ऋतुजा ही पाच महिन्यांची गरोदर होती. ऋतुजा हीचे लग्न झाल्यापासून तिचा सासरा तिच्यावर वाईट नजर ठेवून होता. तिच्या चारित्र्यावर देखील तो संशय घेत होता. एवढेच नव्हे तर मागील सहा महिन्यांपासून कारभारीने सून ऋतुजाकडे शारीरिक सुखाची मागणी करत होता. परंतू ऋतुजा ही सातत्याने त्याला नकार देत होती. मात्र, तरी देखील हा नराधम सुनेचा पिच्छा सोडत नव्हता. या रागातून त्याने गुरूवारी सायंकाळी तिचा गळा आवळून खून केला, तर नात समृद्धी हिला पाण्याच्या टबात बुडवून मारले.
घटनेच्या दिवशी ऋतुजाचा भाऊ ऋषिकेश तिला आपल्या भावीनिमगाव येथे यात्रेसाठी घेऊन जाण्यास आला होता. तो बहिणीच्या घरी पोहचला तेव्हा ऋतुजा बाहेर ओट्यावर पडलेली होती. तर सासरा कारभारी याने समृद्धीला पाण्याने भरलेल्या बकेटमध्ये बुडवून दाबून ठेवले होते. ऋषिकेश याने आरडाओरडा केला म्हणून लोक जमले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत दुर्दैवाने दोघींचाही मृत्यू झालेला होता. पोलिसांनी तात्काळ कारभारी ज्ञानदेव लोंढे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याप्रकरणी ऋतुजाचे चुलते जनार्दन नारायण मगर यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी कारभारी ज्ञानदेव लोढे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दरम्यान, नराधम सासऱ्याने शरीरसुखासाठी गर्भवती सुनेसह चिमुकल्या नातीला ठार केल्याची घटना समोर आल्यानंतर समाजमन सुन्न झाले आहे.