नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत एक हजाराने घट झाली आहे. गेल्या २४ तासांत ४३ हजार ०७१ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ९५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४३,०७१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी शुक्रवारी ४४,१११ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तसेच गेल्या २४ तासांत ५२,२९९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन परतले आहेत. रविवारच्या आकडेवारीनंतर देशात कोरोनाबाधितांचा आजपर्यंतचा आकडा आता ३ कोटींच्या वर गेला असून ही संख्या ३ कोटी ५ लाख ४५ हजार ४३३ इतकी झाली आहे. दरम्यान, एकीकडे नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे मृतांचा आकडा मात्र कमी होण्याचं नाव घेत नाहीये. शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार त्याआधीच्या २४ तासांमध्ये ७३८ मृत्यूंची नोंद झाली होती. मात्र, गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल ९५५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना मृतांचा आकडा ४ लाख २ हजार ००५ इतका झाला आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात काल ८,३९५ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर ९,४८९ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह केसेस एक लाख १७ हजारांच्या वर आहेत. काल मालेगावमध्ये एकही कोरोना रुग्णांची नोंद सरकारी आकडेवारीनुसार झालेली नाही. तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक १२८९ तर कोल्हापूर शहरात ३७६ असे एकूण १६६५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. काल सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील ३८ शहरं आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
















