जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा निवडणूक विभागाने मतदार नोंदणीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे जिल्ह्यातील महिला मतदारांची संख्या पुरूषांच्या तुलनेत वाढली आहे. जिल्ह्यात १६ लाख ५७ हजार ७६ महिला मतदार संख्या होती. २७ ऑक्टोबर ते २४ डिसेंबर २०२३ या दोन महिन्यांतील विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मतदार नोंदणी कार्यक्रमातील आकडेवारीनुसार जिल्ह्यात महिला मतदारांमध्ये २२६८१ ने वाढ झाली आहे. आता जिल्ह्यात १६ लाख ७९ हजार ७६७ मतदार झाले आहेत. तर याच कालावधीत पुरूष मतदारांमध्ये ४४२८० ने वाढ झाली आहे. पुरूष मतदारांमागे महिला मतदारांची सरासरीत ४ ने वाढ होत ९२१ वरून ९२५ इतकी सरासरी झाली आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी मागील काही महिन्यात महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी विविध उपक्रम व शिबिरांचे आयोजन केले. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवात मतदार नोंदणी बाबत जनजागृती करण्यात आली. ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त दुर्गम अशा सातपुड्याच्या आदिवासी भागात जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये नवमतदारांसाठी शिबिरांचे वेळोवेळी आयोजन करण्यात आले. १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर कालावधीत ग्रामसभांमध्ये जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात १८ वर्षापूढील नवमतदारांसाठी नोव्हेंबर २०२३ या महिन्यात ४ विशेष शिबीरे घेण्यात आली. १८ व १९ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रावर विद्यार्थीनींनी, महिला, दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. मतदार नोंदणी वाढावी यासाठी रॅली, पोस्टर, बॅनर व सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रचार -प्रसार करण्यात आला.
भुसावळ, जळगाव शहर, एरंडोल, चाळीसगाव व जामनेर मध्ये महिला मतदार सर्वाधिक वाढले
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार भुसावळ, जळगाव शहर, एरंडोल, चाळीसगाव व जामनेर शहरात सर्वाधिक महिला मतदार वाढले आहेत. जळगाव शहरात २७९२ , भुसावळ २५२८, एरंडोल २२२४, चाळीसगाव २३२२ व जामनेर २२१८ महिला मतदार वाढले आहेत. याखालोखाल चोपडा, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, पाचोरा व मुक्ताईनगर या मतदार संघाचा नंबर लागतो.
तृतीयपंथी मतदार वाढले
जिल्ह्यात २ व ३ डिसेंबर रोजी तृतीयपंथीय व्यक्तींसाठी मतदार नोंदणीचे विशेष शिबीरे घेण्यात आली. यामुळे तृतीयपंथीय मतदारांची संख्याही ८ मतदारांने वाढली आहे. ५ जानेवारी २०२३ रोजी जिल्ह्यात १२३ तृतीयपंथीय मतदार होते. आता १३१ तृतीयपंथीय मतदार आहेत. जिल्ह्यात भुसावळ, जळगाव शहर व चाळीसगाव मध्ये सर्वाधिक तृतीयपंथीय मतदार आहेत.
“राज्यात नऊ डिसेंबरला मतदार नोंदणी मुदत संपली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने नऊ डिसेंबरनंतरही मतदार नोंदणीची संधी दिली आहे. यासाठी अर्ज ऑनलाइन, ऑफलाइन भरता येणार आहेत. तेव्हा जास्तीत जास्त नवमतदारांनी ऑफलाईन किंवा व्होटर रजिस्टर अॅपच्या मदतीने लवकरात लवकर नोंदणी करावी” असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.