औरंगाबाद (वृत्तसंस्था) बहिणींना कंपनीमध्ये सोडण्यासाठी दुचाकीवर ट्रिपलसीट जाणारा भाऊ आणि त्याच्या दोन बहिणींचा ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी ८.२० वाजेच्या सुमारास मॅन एनर्जी सोल्युशन कंपनीसमोर घडली. दीपक कचरू लोखंडे (२०) आणि त्याच्या बहिणी अनिता (२२) व निकिता ऊर्फ राणी (१८) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही रांजणगाव कमळापूर येथील रहिवासी आहेत.
दीपकच्या दोन्ही बहिणी कंपनीत कामाला होत्या. तो आपल्या बहिणीला नेहमीप्रमाणे कंपनीत सोडायला निघाला होता. मात्र, आज या तिघांची वाट पाहत जणू काही मृत्युचं थांबला होता. कारण, दीपक आपल्या बहिणीला सोडायला कंपनीत जात असताना रांजणगाव शेंनपूजी फाट्याजवळ असलेल्या एन.आर.बी. चौकालगत भरधाव वेगात येणाऱ्या (एम.एच. 04 . एफ. जे. 5288) या क्रमांकाच्या ट्रकने दीपकच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने तिघेही गंभीररित्या जखमी झाले होते. त्यानंतर तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
पाच बहिणींमध्ये एकुलता एक असणारा दीपक सर्वांचाच लाडका होता. त्याच्या जाण्याने आमच्या आयुष्यात कायमचा काळोख पसरला आहे. अनिता आणि निकिताने गुरुवारी पहाटे उठून घर आवरले. अनिताने स्वयंपाक केला. दोघींचे डबे भरून नाष्टा केला. दीपक दोघींना सोडण्यासाठी निघाला. ‘ताई, डबा भरून ठेव, मी लगेच येतो,’ असे म्हणून त्याने डबा भरला. पण तो पुन्हा परत आलाच नाही. त्याने जेवणही केले नव्हते.
















