धरणगाव (प्रतिनिधी) गावाचा विकास आराखडा तयार करताना प्रत्येक सरपंच व ग्रामसेवक यांनी गावाच्या समस्यांचा नकाशा डोळ्यासमोर ठेवा. सरपंच व ग्रामसेवक यांच्यात समन्वय असला पाहिजे. विकास आराखडे तयार करण्यासाठी हे प्रशिक्षण दिशादर्शक असून गावाच्या विकास आराखड्यात प्रत्येक घटकाचा विकास कसा होईल ? याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. गाव विकास आराखड्यात पाणी, स्वछाता व आरोग्य या बाबी अति महत्वाच्या असून त्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करून गावाच्या शेवटच्या घटकातील लोकांचा कल्याणाचा विचार करून गावाच्या विकास आराखड्यातून गावाच्या सर्वांगीण विकासाचे दर्शन व्हावे असा विकास आराखडा तयार करण्याचे आवाहन करून गाव विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले . ते “आमचा गाव – आमचा विकास” उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा बाबत आयोजित तालुकास्तरीय कार्यशाळेत बोलत होते.
सुरुवातीला संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात बी.डी.ओ. सुशांत पाटील यांनी कार्यशाळा प्रशिक्षण बाबत माहिती विषद करून गावाचा कृती आराखडा बाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी कैलास पाटील यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी व्ही.एस. महाजन यांनी मानले. आयोजन पंचायत समिती धरणगाव यांनी केले होते. त्यासाठी ग्रामविकास अधिकारी दिपक पाठक यांनी मोलाचे सहकार्य केले.
पालकमंत्री म्हणाले की, समन्वयाशिवाय गावाचा विकास शक्य नाही. गावाची गरज ओळखून गावाचा विकास आराखडा तयार करा. गावाच्या विकासाच्या बाबत शासन नियम व कायदे ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी समजून घेवून गाव जिल्ह्यात व राज्यात चमकले पाहिजे, यासाठी गाव विकासात्मक प्रगतीपथाकडे नेण्यासाठी दूरदृष्टीचा विकास आराखडा बनवा. तसेच याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार धरणगाव तालुक्यातील पात्र ३९ गावांमध्ये आदिवासी वस्तीत ठक्कर बाप्पा योजनेतर्गत सौर पथदिवे व सौर हायमास्ट पॅनल बसविले जाणार असल्याचे आदिवासी विभागचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी सांगितले. यावेळी सरपंच व ग्रामसेवक यांना प्रवीण प्रशिक्षक सुनील वाणी व भूषण लाडवंजारी व मुकुंदराव नन्नवरे यांनी १५ व्या वित्त आयोग आणि गाव विकासाच्या आराखडा बाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले. उपस्थितांना वाचन साहित्यही देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी व्यासपीठावर एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार , माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, बी.डी.ओ. सुशांत पाटील , ग्रामसेवक संघटना अध्यक्ष सी.एन. सोनवणे, विस्तार अधिकारी, कैलास पाटील, व्ही. एस. महाजन, गट शिक्षणाधिकारी भावना भोसले, म.बा.विकास अधिकारी संजय धनगर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण , समन्वयक सुरेश शिंदे , ग्रामविकास अधिकारी दिपक पाठक आदी उपस्थित होते.
















