नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवरून शुक्रवारी सत्ताधारी भाजपवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घणाघाती टीका केली आणि हरयाणात काँग्रेस सत्ता आल्यानंतर रोजगारनिर्मिती करून राज्य नशामुक्त केले जाईल, असे आश्वासन दिले.
हरयाणाची जनता लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भांडवलशाही धोरणांचा चक्रव्यूह तोडण्यासाठी प्रहार करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतदान होणार आहे. त्यापूर्वी राहुल यांनी सोशल मीडियावरून राज्य व केंद्रातील भाजपला लक्ष्य केले. अलीकडेच मी गोहानातील स्वादिष्ट जिलेबीचा आस्वाद घेतला. येथील जिलेबी मोठ्या प्रमाणावर विकल्या जाऊ शकते. देशात छोट्या उत्पादकांचे सुमारे ५५०० समूह आहेत. त्यांना योग्य पाठबळ मिळाले तर ते आपली उत्पादने जगभरात विकू शकतात. यासाठी वित्त, तंत्रज्ञान, नेटवर्क, ब्रँडिंग यांचे समग्र धोरण तयार करण्याची गरज आहे.
छोट्या व्यावसायिकांना सशक्त करूनच देशाचा आर्थिक विकास वेगाने होईल. परंतु पंतप्रधान मोदी केवळ आपल्या काही उद्योगपती मित्रांचे हित जपत आहेत, असे राहुल म्हणाले. हरयाणा आणि देशात भाजपने अर्थव्यवस्थेला ग्रहण लावले आहे. सत्ताधाऱ्यांनी छोट्या व्यवसायांना नष्ट करून लाखो लोकांना देश सोडण्यास भाग पाडले आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच हरयाणाची जनता या निवडणुकीत भाजपला धडा शिकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हरयाणात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर सर्वप्रथम रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येईल. तसेच राज्याला अमली पदार्थांच्या गर्तेतून बाहेर काढण्यात येईल, असे राहुल यांनी सांगितले. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टसोबत हरयाणातील जनतेशी संवाद साधतानाचे काही व्हिडिओदेखील शेअर केले.