मोहोळ (वृत्तसंस्था) कोणीतरी पठ्या म्हणाला, दादांचा दौरा मी रद्द केला. अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे. कुत्र्याला वाटत असतं मी बैलगाडी ओढतोय. पण अरे, ते बैलगाडी ओढत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अचानक दौरा आला म्हणून मी मोहोळचा दौरा रद्द केला, असा घणाघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
मोहोळ (जि. सोलापूर) येथे अजित पवार यांच्यासमोरच जनसन्मान रॅलीच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गटबाजी उघड झाली आहे. आमदार यशवंत माने यांनी अजित पवार यांच्याकडे नाव न घेता पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांची तक्रार केली आहे. विरोधकांबरोबर संधान साधून माझ्या विरोधात खालच्या पातळीच्या भाषेचा वापर केला जात असल्याचा आरोप आ. यशवंत माने यांनी केला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दांत सुनील तटकरे यांनी उमेश पाटील यांना सुनावले. राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेणाऱ्याला पक्ष जागा दाखवेल, असा इशारा
सुनील तटकरे यांनीही पाटील यांचे नाव न घेता दिला. राष्ट्रवादीच्या अध्यक्षांच्या नावाचा वापर करून पक्षामध्ये बेशिस्त वर्तन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पक्षाचा आमदार म्हणून विनंती करतो, या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण दिलेला उमेदवार फार चांगल्या मतांनी निवडून येणार आहे. म्हणून विरोधकांसोबत संधान साधून माझ्यावर, माजी आमदार राजन पाटील आणि त्यांच्या मुलांवर विविध प्रकारचे आरोप केले जातात, खालच्या पातळीची भाषा वापरली जाते. हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे, एवढीच मी विनंती करतो. आपण त्यावर निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया आमदार यशवंत माने यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी २०१४ ते १८ सालात काम केले आणि आता मी गेले वर्षभर त्या पदावर काम करत आहे. पक्षातील बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही. माजी आमदार राजन पाटील, आ. यशवंत माने यांना लक्ष्य करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जो कुणी भूमिका घेईल, त्याला त्याची जागा दाखवण्याचे काम केले जाईल, असा इशारा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी दिला.