नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हरयाणाच्या कर्नाल (karnal) जिल्ह्यातून चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. संशयित दहशतवादी हरिवंदरसिह रिड्डा यांच्याशी संबंधित असल्याीची माहिती आहे. चार संशयित पंजाबमधून महाराष्ट्रातील (Maharashtra) नांदेडमध्ये निघाले होते, अशी माहिती समोर आली आहे.
बस्ताडा टोन नाक्यावर चार जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीपासून कर्नाल ११८ किमी अंतरावर आहे. पोलिसांच्या माहितीनुसार चार संशयित दहशतवादी मोठी घटना घडवण्याच्या बेतात होते. पोलिसांच्या माहितीनुसार तीन व्यक्ती पंजाबच्या फिरोजपूरमधील आहेत. तर,चौथा व्यक्ती लुधियानामधील आहे. चौघे इनोव्हा गाडीतून दिल्ली मार्गे महाराष्ट्रतील नांदेडकडे निघाले होते.
सुरक्षा यंत्रणांच्या प्राथमिक अंदाजानुसार संशयितांचा पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. आयबी आणि पोलिसांनी केलेल्या आतापर्यंतच्या चौकशीनुसार या घटनेमागं पाकिस्तानचा संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बब्बर खालसाच्या संशयित दहशतवाद्यांना पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून शस्त्र पुरवण्यात आली होती. पाकिस्तानातील दहशतवादी हविरंदर सिंह रिंडा याच्याशी चौघांचा संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. बॉम्ब निकामी करणारं पथक मिळालेल्या स्फोटकांना निष्क्रीय करण्याचं काम करत आहे.
आयबीच्या अलर्टनुसार बसताडा टोलनाक्यावर नाकेबंदी करण्यात आली होती. आजूबाजूच्या जिल्ह्यांतील सुरक्षा यंत्रणांना देखील अलर्ट करण्यात आलं होतं. कर्नालमध्ये नाकेबंदी करण्यात आली होती. त्या टोलनाक्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होती. सुरक्षा यंत्रणाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित दहशतवादी हे बब्बर खालसा संघटनेशी संबंधित आहेत, इनोव्हा गाडीतून तीन भूसुरुंग, बंदूक आणि ३१ काडतूस जप्त करण्यात आली आहेत. संशयित दहशतवादी हे पंजाबमधून दिल्लीकडे जाणार होते आणि तिथून महाराष्ट्रातील नांदेडमध्ये येणार होते. गेल्या आठवड्यात पंतियाळामध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर पोलीस आणि सुरक्षा दल सतर्क झाले होते.