पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी) बजाज ईन्शुरन्स कार्यालयातून ईन्शुरन्स मिळविण्यासाठी स्कोडा कंपनीच्या गाडीचा अपघात झाल्याचा खोटा बनाव केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पहूर पोलिस स्थानकात सुमित जवाहरलाल मानधन, इमरान शेख हुसेन उमर (दोघे रा. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात बजाज एलियाज ईन्शुरन्स कंपनीचे उपव्यवस्थापक सुयोग ताराचंद हाडके (वय ३७ रा. गुडविल प्लॉट नंबर २०३, धानोरी पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुमित जवाहरलाल मानधन, इमरान शेख हुसेन उमर (दोघे रा. जळगाव) यांनी कट रचून बजाज एलियाज ईन्शुरन्स कार्यालयातून ईन्शुरन्स मिळविण्यासाठी गाडी (क्र. MH २० BQ ५३७३) स्कोडा सुपर्ब कंपनिची गाडी हिचा अपघात झाल्याची खोटी माहीती सुमित याने कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर दिली. तसेच सदर वाहनाचा अपघात झाल्याचा खोटा बनाव केला. याप्रकरणी पोलीस स्थानकात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गर्जे हे करीत आहेत.