जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील मनपा मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांच्या प्रश्नावर विधिमंडळात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही पक्षाचे एकमत झाले असून तोवर गाळेधारकांना जुना नियम लागू करीत त्यांच्याकडून लिखित घेण्याचे विधिमंडळात ठरविण्यात आले.
फडणवीसांनी गाळ्यांचा मुद्दा मांडला
जळगाव जिल्ह्यातील मनपा मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गाळ्यांचा मुद्दा मांडला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर समर्पक उत्तर देत मंत्रीमंडळात यावर चर्चा झाली असल्याचे सांगितले.
सध्या करवाढ ०.२ वरून थेट ८ टक्के करण्यात आली होती. तसेच व्याजदर दरमहा दोन टक्के होते तर भाडेपट्टा नूतनीकरण करार १० वर्ष होता. निवासी आणि व्यावसायिक वापराच्या दृष्टीने वेगवेगळे दर निश्चित करून मनपाचे, व्यापाऱ्यांचे हित, महसुलाची बाजू, रेडीरेकनर दर निश्चित करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचे शिंदे यांनी सांगितले. दोन्ही पक्षाचे यावर एकमत झाले असून तोवर गाळेधारकांना जुना नियम लागू करीत त्यांच्याकडून लिखित घेण्याचे विधिमंडळात ठरविण्यात आले.