जळगाव (शिवराम पाटील) जळगावमध्ये खानदेश विकास आघाडीची सत्ता होती. रस्ते,गटारी,घरकुल, मार्केट बनवली. पण घरकुल बांधकाम ठेक्यात सहा कोटी मनपाचे परत केले नाहीत. म्हणून सुरेश जैन सहित ५२ नगरसेवक अडचणीत आले. तब्बल तेरा वर्षांनंतर कारवाई झाली. जेल झाली. दंड बसला. जो अजून भरला नाही. यामुळे लोकांनी बदल केला. २०१४ मध्ये भाजपचे आमदार आणि महानगरपालिका नगरसेवक निवडून दिले. जैन चुकले. हे नाही चुकणार, असा समझ होता. पण हे तर घसरले. त्यांनी तर रस्ते, गटार, सफाईची पुर्ण वाट लावली. पैसा असूनही कामे होत नाही. पेपर, टिव्हीमध्ये बातमी येऊनही फरक पडत नाही. लोक बोंबा मारतात. चूप बसतात. कोणी ढुंकून पाहात नाहीत.
आता भाजपचे २७ नगरसेवक शिवसेनत गेले. सत्ता शिवसेनेकडे आली. तरीही काहीच कामे होत नाहीत. उलट चाकू, सुरी, पिस्तूलचे गेम होऊ लागले. शहराचा विकास बाजूला राहिला. मधेच गुन्हेगारी सुरू झालीय. राजकीय गुन्हेगारी. जर सत्ता गुन्हेगारांकडे असेल तर आधिकारी इमानदारी करतील का?. काँग्रेसचे डॉ. राधेश्याम चौधरी एकमेव माणूस आंदोलने करून आशा फुलवत होते. काँग्रेसच्या लोकांना आवडले नाही, म्हणून जळगाव फर्स्टच्या बॅनर खाली आंदोलने करू लागले. पण मध्येच काय माशी शिंकली आणि डॉ. चौधरी भाजपत दाखल झाले. आता जनतेचा आवाज संपला. जो कधी जळगाव जिल्हा जागृत जनमंच सोबत ऐकायला येत होता. आम आदमी पार्टी सोबत ऐकायला येत होता.
जळगावमध्ये आम आदमी पक्ष सुरूवातीला उभा राहिला. पण मुंबईच्या नेत्यांनी पदे विकून कॅश केले. त्यामुळे संघटना विस्कळीत झाली. सदस्य दाणेफाण झाले. कोणी कोणाचे ऐकेनासे झाले. ती पण आशा मावळली.
जळगाव शहरात सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय व्यवसाय केला. राजकारण म्हणजे धंदा किंवा धंद्यासाठी आधार समजले. त्यामुळे राजकारणात आधी डॉक्टर, प्रोफेसर, वकील होते. आता दारूवाले, रेतीवाले, स्पावाले, ब्युटी पार्लर वाले, भू माफिया, बिल्डर बळकावून बसले. कारण यांच्याकडे बेहिशोबी पैसा असतो. ते फेकतात, चिंचोकीसारखा. लोक भुलतात. नेता मानतात. तद्दन गुंड गुन्हेगारांचे नावाने बनियन घालून तरूण पोरं मिरवू लागले. हे भयानक चित्र क्वचित कोणत्या शहरात असेल.
अशी परिस्थिती असताना नागरिक मात्र मुकबधीर बनले. शिक्षीत, उच्च शिक्षीत अंग चोरून जगू लागले. एकमेकांना विचारू लागले. आता आपल्या जळगावला कोण तारू शकतो?. ही अवस्था कोण बदलवू शकतो?कांग्रेस की भाजपा?, शिवसेना की राष्ट्रवादी?, खाविआ की आप? कुठेही चांगले चित्र दिसत नाही. जिकडे तिकडे गँग. राजकीय पक्षांच्या गँग. रोजी रोटी नसलेले तरूण पोरं अशा गँगमध्ये सामील होऊन खाण्यापिण्याची सोय शोधू लागले आहेत. भयानक अवस्था. भयावह भविष्य. जैन, खडसे, भोळे, महाजन यांना अजमावून घेतल्यानंतरची अवस्था खूप विमनस्क आहे. यांच्या सावलीत उगवलेली डिस्को संस्कृतीतील पोरं आता राजकारणात उतरली आहेत. धृतराष्ट्राने हे हाल केलेत. आता दुर्योधन, दुःशासन काय करतील?
जळगावच्या लोकांनी आता कोणत्याही पक्षाकडे पाहिले तरी जळगाव विकासाची आशा नाही. सगळेच आपापले फासे टाकून द्यूत खेळत आहेत. तेथे जनतेचा, विकासाचा विचार करायला जागा नाही. विकासाचा तर लवलेश नाही. मग कोण तारेल जळगावला? जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा तेव्हा समाजातील चांगली माणसे पुढे येतात. आणीबाणीत जयप्रकाश नारायण. नंतर आण्णा हजारे. कोणत्याही राजकीय पक्षाचे नेतृत्व नसताना सत्ता उलथवून टाकतात. तिच वेळ जळगावची आलेली आहे. म्हणून आम्ही जळगावमधील, सभ्य, शिक्षीत लोक एकत्र येत आहोत. ज्यांचा राजकारण हा व्यवसाय नाही. उत्पन्नाचे साधन नाही. राजकारण हा व्यवसायाचा आधार नाही. त्यांच्या उत्पन्नाचे साधन कोणीही अडवू शत नाही, थांबवू शकत नाही, असे लोक एकत्र येणे आवश्यक आहे.
माझा चेक अडकला. माझा पगार अडकला, माझे अनुदान अडकले. माझी ट्रिटमेंट अडकली. माझे वाहन जप्त झाले. माझे दुकान सील झाले. अशी कोणतीही तक्रार नसलेले लोकांनी एकत्र आले पाहिजे. ज्यांना जिवंतपणी नव्हे, मरणोत्तर नगरपालिकेची लाकडे नकोत, राकेल नको, आगपेटीही नको. अशी माणसे एकत्र आली पाहिजे आहेत अशी माणसे जळगावला. किमान एक लाख. त्यातून शंभर जरी एकत्र आलीत आणि ‘आम्ही जळगावचे, जळगाव आमचे’ समजून काम करू लागली तर जळगाव बदलणे मुश्कील नाही.
यासाठी एक व्यासपीठ बनवले. जळगाव जिल्हा जागृत जनमंच. मागील पांच वर्षापासून जनहिताचे प्रश्न घेऊन लढत आहे. अनेक प्रश्न मार्गी लावले. नेता मोठा असो कि लहान, चोरीला ठामपणे विरोध केला. आधिकारी मोठा असो कि लहान, भ्रष्टाचाराला ठामपणे विरोध केला. या मासिकतेचे, या प्रवृत्तीचे, या दिशेने काम करणारी माणसे जोडीला गेली. जनतेचे संघटन एका राजकीय पक्षाच्या तोडीने काम करू लागले. पुढारी,आधिकारी, पत्रकार दखल घेऊ लागले. उघड नसला तरी मनापासून समर्थन करू लागले. डॉक्टर, वकिल, इंजिनिअर, प्रोफेसर जुळू लागले. आम्ही येतो, असे स्व:ताहून आवाहन करू लागले. हा प्रवाह असाच एकत्र आला तर नक्कीच जळगावचे नेतृत्व करू शकतो. जळगाव बदलवू शकतो. जळगावची भ्रष्ट प्रतिमा पुसू शकतो. जळगावचा पैसा जळगावसाठी वापरू शकतो.
जळगावमध्ये विकास कामे करण्यासाठी घरे दारे विकून भुकेले प्यासे राहून पैसा जमवायची गरज नाही. मी देतो, असे म्हणण्याची गरज नाही. कर वाढवण्याची गरज नाही. कर्ज काढण्याची गरज नाही. मुंबई, दिल्लीकडे भीक मागण्याणी गरज नाही. फक्त चोरी थांबवण्याची गरज आहे. गळकी बंद करण्याची गरज आहे. म्हणून प्रामाणिक माणसांची गरज आहे. जनतेचा पैसा करातून जमा होतो. तोच पैसा ५० टक्के वापरला तरी जळगाव बदलू शकते. १०० टक्के वापरला तर विकास करू शकतो.
जळगावमधील शिक्षीत, सुज्ञ ,प्रामाणिक लोकांना हा संदेश पोहचवणे आवश्यक आहे. दिल्ली बदलली. जळगाव बदलू शकते. मी,तुम्ही, आपण बदलवू शकतो. बाहेरचा माणूस येईल आणि जळगाव बदलवून टाकील, असा विचार करणे चुकीचे आहे. जळगाव तुमचे आहे. जळगाव आमचे आहे. तुम्ही आम्हीच बदलले पाहिजे. बदल शक्य आहे. आधी आम्ही बदलले पाहिजे. ती प्रक्रिया सुरू झाली आहे. तुमचा सहभाग आवश्यक आहे. या,वाट पाहातो, तुमची !
….शिवराम पाटील.
8270963122
महाराष्ट्र जागृत जनमंच.
सूचना : या लेखात व्यक्त केले गेलेले विचार लेखकाचे स्वतःचे विचार आहेत. या लेखातील टीका, टिप्पणी, अथवा सत्यतेप्रती ‘क्लिअर न्यूज’ उत्तरदायी नाहीय. या लेखातील सर्व मुद्दे जशीच्या तशी घेण्यात आली आहेत. या लेखातील कोणतीही माहिती अथवा व्यक्त करण्यात आलेले विचार ‘क्लिअर न्यूज’चे नाहीत.