धरणगाव (प्रतिनिधी) राज्य कापूस पणन महासंघातर्फे धरणगाव येथे कापूस खरेदी केंद्राचे शनिवारी उदघाटन झाले. परंतू तत्पूर्वी या कार्यक्रमाच्या पत्रिकेत अनेक मान्यवरांची नावं वगळण्यात आल्यामुळे वाद उफाळून आला होता. या कार्यक्रम पत्रिकेचे पडसाद जिल्हा राष्ट्रवादीच्या बैठकीतही उमटल्याचे वृत्त आहे. एवढेच नव्हे तर याची तक्रार थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे करण्यात येणार असल्याचेही कळते.
राज्य शासनाने परवानगी दिल्यामुळे राज्य कापूस पणन महासंघाचा कापूस खरेदीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात पारोळा आणि धरणगाव येथे २८ नोव्हेंबर रोजी कापूस खरेदीला सुरुवात झाली. परंतू धरणगावच्या पत्रिकेत अनेकांची नावं वगळण्यात आल्यामुळे मोठा वाद उफाळून आला आहे. या कार्यक्रम पत्रिकेतून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, धरणगावचे प्रथम नागरिक तथा तालुक्यातील सर्वात मोठे जिनिंग व्यावसायिक म्हणून निलेश चौधरी, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, धरणगावातील राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे यांचं देखील कार्यक्रम पत्रिकेत नाव नव्हते. त्यामुळे तालुक्याच्या राजकीय गोटात वेगळीच चर्चा सुरु झाली होती. दुसरीकडे शनिवारी जिल्हा राष्ट्रवादीच्या बैठकीत या कार्यक्रम पत्रिकेचे पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर आणि जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्याकडे याबाबत आपली नाराजी व्यक्त केली. या तक्रारीची दखल घेत श्री.देवकर आणि जिल्हाध्यक्ष श्री. पाटील यांनी याबाबत थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे याबाबत बोलणार असल्याचे सांगितले.