नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे. परंतु, मृतांच्या आकड्यात मात्र फारशी घट झाल्याचं पाहायला मिळत नाही. गेल्या २४ तासांत १ लाख ६५ हजार ५५३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ३४६० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांतील कोरोना परिस्थितीबद्दलचे आकडे मंत्रालयाने प्रसिद्ध केले असून, दिलासादायक चित्र दिसत आहे. २४ तासांत देशात एक लाख ६५ हजार ५५३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोन लाख ७६ हजार ३०९ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. देशभरात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. सध्या देशात २१ लाख १४ हजार ५०८ रुग्ण उपचार घेत आहेत. २४ तासांत आढळून आलेले रुग्णसंख्या ही ४६ दिवसांनंतरची सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. म्हणजेच सहा आठवड्यानंतर देशात कमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.
कोरोना रुग्णवाढीबरोबरच देशातील मृतांची वाढत्या संख्येनं काळजी वाढवली होती. देशात दिवसाला साडेचार हजार मृत्यू नोंदवले गेले. काही आठवडे देशात दिवसाला साडेतीन ते चार हजारांच्या सरासरीने मृत्यू झाले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोपच उडाली होती. मात्र, आता हळूहळू रुग्णसंख्येतही घट होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांत ३४६० रुग्णांचा मृत्यू झाल्यांची नोंद झाली आहे. मात्र, मृत्यूंचा हा आकडा अजूनही चिंताजनकच आहे.