जळगाव (प्रतिनिधी) बँकेच्या बाहेर टेहाळणी करत संधी साधून एखाद्या ग्राहकाजवळील पैशांची बॅग चोरून नेण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या टोळीतील मुख्य संशयिताला जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून ३ लाख १८ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. वसंत बनवारीलाल सिसोदया वय ३०, रा.कडीयागाव ता. पचोर जि. राजगढ राज्य मध्यप्रदेश असे अटक गुन्हेगाराचे नाव आहे.
जळगाव जिल्ह्यात बँकेसमोरून व गर्दीच्या ठिकाणाहून पैशांच्या बॅगा चोरी झाल्याच्या घटनेत वाढ झाले होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू असताना काही दिवसांपूर्वी पारोळा गावातील एसबीआय बँकेसमोर पैशांची बॅग लांबवणारे टोळी पुन्हा सक्रिय झाले असून त्याच परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल नंदलाल पाटील व पोलीस नाईक भगवान पाटील यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, पोलीस नाईक भगवान पाटील, राहुल बैसाणे, ईश्वर पाटील आणि प्रमोद ठाकूर या पथकाने रविवारी २१ जुलै रोजी दुपारी २ वाजता सापळा रचून पारोळा शहरातून संशयित आरोपी बसंत बनवारीलाल शिसोदिया याला अटक केली. त्याच्याकडून ३ लाख १८ हजार रुपयांची रोकड मिळून आली. दरम्यान त्याने दोन दिवसांपूर्वी पारोळा शहरातील एसबीआय बँक परिसरात त्याच्यासाठी रिशी सिंगदर सिसोदिया व विशाल उर्फ मोगली सिसोदिया दोन्ही रा.गूलखोडी ता. पाचोर जिल्हा राजगढ यांनी मिळून चोरी केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान टोळीतील मुख्य सूत्रधार असल्याचे सांगून पुन्हा एकदा चोरी करण्याच्या तयारीत असल्याची कबुली दिली. यापूर्वी त्यांनी पाचोरा, धरणगाव आणि जिल्ह्यातील एक इतर परिसरात चोरी केल्याचे देखील सांगितले आहे. दरम्यान पोलिसांनी त्याला अटक करून पुढील कार्यासाठी पारोळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.