धरणगाव (प्रतिनिधी) एकशे सहा वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील नामवंत शतकोत्तरी पी.आर. हायस्कूलची विद्यार्थिनी विशाखा विजय माळी या सावित्रीच्या लेकीला उद्या विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी दहावीच्या परीक्षेत तालुक्यातून प्रथम आल्याबद्दल पालकमंत्री ना, गुलाबरावजी पाटील यांच्याकडून स्कूटी भेट म्हणून मिळणार आहे. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील आणि शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पाळल्याबद्दल पी.आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी आभाराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षी शिवसेनेच्या वतीने पी.आर.हायस्कूल मध्ये गरजू,गरीब , हुशार विद्यार्थ्यांना वह्या वाटपाच्या कार्यक्रमात नामदार गुलाबरावजी पाटील यांनी दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम येणार्या विद्यार्थ्यांला बॅटरीवर चालणारी स्कूटी भेट म्हणून देण्याचा संकल्प जाहीर केला होता.हा संकल्पपूर्तीचा कार्यक्रम उद्या सकाळी नऊ वाजता नगरपालिकेत होणार असून पी. आर. हायस्कूलच्या या सावित्रीच्या लेकीला ही अनोखी भेट जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील, जिल्हा शिवसेना प्रमुख माननीय गुलाबराव वाघ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार असल्याचे धरणगाव नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी यांनी मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांना कळवले आहे.