मेहूणबारे (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून राज्यातील उकाडा (Heat) वाढत चालला आहे. यामुळे राज्यातील तापमान चांगलेच (Temperature rise) वाढले आहे. उन्हामुळे लाहीलाही होत असल्यामुळे अनेकांनी घराबाहेर पडणेही बंद केल्याचे दिसत आहे. अशातच मेहूणबारे येथील ४८ वर्षीय शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यु झाला. उष्माघाताचा चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यात पहिला बळी गेला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पार सतत वाढत असल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक घराबाहेर न पडता सावलीचा व थंड पेयाचा आधार घेत आहेत. शहरासह ग्रामीण भागात जवळपास 40 पेक्षा अधिक अंश सेल्सियसवर पारा गेला असून अशा स्थितीत सर्वच जण उष्णतेने हैराण झाले आहेत. मेहूणबारे (ता.चाळीसगाव) येथील सुंदरलाल सुकदेव गढरी (वय 48) हा शेतमजूर बकऱ्या चारण्यासाठी गेला होता. नेहमीप्रमाणे बकऱ्या चारण्यासाठी गेला असता दुपारी दीड ते पावणे दोन वाजेच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आल्याने ते घरी आले. त्यांना डॉक्टरकडे नेले जात असतांनाच त्याचा मृत्यु झाला. खाजगी डॉक्टरांनी त्यांना तपासले असता उष्माघाताने मृत्यु झाल्याचे सांगितले.
परिवार उघड्यावर
मृत सुंदरलाल गढरी यांची घरची परिस्थिती बेताची व गरीबीची होती. मोलमजुरी करून तसेच बकऱ्या चारून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. बकऱ्या चारण्यासाठी गेले आणि दुपारी अचानक चक्कर आले. त्यामुळे ते घरी आले आणि त्यांचा मृत्यु झाला. या घटनेने मेहूणबारेसह परिसराव एकच शोककळा पसरली आहे. मृत गढरी यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे.
















