धरणगाव (प्रतिनिधी) विद्यमान नगर पालिकेचा कार्यकाळ २७ डिसेंबर रोजी संपतोय. त्यामुळे आपापल्या वार्डातील उर्वरित विकास कामे पूर्ण करून घेण्यासाठी विद्यमान नगरसेवकांच्या हातात आता अवघे १६ दिवस उरले आहेत. पुढील तीन-चार दिवसात पालिकेची शेवटीची होणारी सर्वसाधारण सभा वादळी ठरू शकते. शेवटच्या सभेत सत्ताधारी विविध विकासकामे मंजूर करण्याचा प्रयत्न करतील. तर विरोधीपक्ष विविध मुद्यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, पुढील काही दिवसात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग येण्याची शक्यता असून पालिकेवर प्रशासक राज बसणार असल्याचीही चर्चा आहे.
शेवटची सर्वसाधारण सभा वादळी होण्याची शक्यता
पालिकेची प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रिया जोपर्यंत पार पडत नाही, तोपर्यंत निवडणुकांच्या संदर्भातील पुढचा टप्प्याला सुरुवात होऊच शकत नाही. दुसरीकडे या महिन्याच्या अखेरी २७ डिसेंबर रोजी विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत संपणार आहे. या तारखेपर्यंत पालिकेचे नवीन सदस्य अर्थात नगरसेवक निवडणे किंवा विद्यमान सदस्यांना मुदतवाढ मिळणे कायदेशीरदृष्ट्या शक्य नसल्याने येत्या काही दिवसात शासनाकडून पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती केली जाण्याची दाट शक्यता आहे. कारण प्रशासक राजचे मोठे उदाहरण जळगाव जिल्ह्यातील भडगाव पालिका आहे. कोरोनामुळे मागील गेल्या दोन वर्षांपासून तेथे प्रशासक राज आहे. दरम्यान, पुढील तीन-चार दिवसात पालिकेची शेवटीची सर्वसाधारण सभा होणार असल्याचे कळते. ही सभा वादळी होण्याची शक्यता आहे. शेवटच्या सभेत सत्ताधारी जास्तीत जास्त विकासकामे मंजूर करण्याचा प्रयत्न करतील. तर विरोधीपक्ष म्हणून भाजप विविध मुद्यावरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारात धारेवर धरण्याचा प्रयत्न करेल.
विकास कामांसाठी हातात उरले केवळ शेवटचे १६ दिवस
दुसरीकडे पालिकेची मुदत संपणार असल्यामुळे पुढील निवडणुकीची रणनीती आखायला राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. पालिकेत आजच्या घडीला शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेकडे १६ नगरसेवक तर भाजपकडे ६ नगरसेवक आहे. पालिकेच्या राजकारणाच्या वर्तुळाच्या दृष्टीने विचार केला तर शिवसेनेचे स्व. नगराध्यक्ष सलीमभाई पटेल यांच्यानंतर शिवसेनेच्या गोटात आधीसारखे आलबेल राहिलेले नाहीय. तर दुसरीकडे विरोधीपक्ष म्हणून भाजपचे ललित येवले यांच्या व्यतिरिक्त कुणीही पाहिजे तसा सत्ताधाऱ्यांना सभागृहात जाब विचारलेला दिसून येत नाहीय. थोडक्यात आता पालिकेच्या सभागृहातील नगरसेवकांच्या हातात आपापल्या वार्डातील उर्वरित विकास कामी मंजूर करून घेण्यासाठी हातात केवळ शेवटचे १६ दिवस उरले आहेत.
पुढील काही दिवसात राजकीय घडामोडींना वेग येणार
मागील अनेकवर्षापासून पालिकेवर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची सत्ता आहे. परंतू शिवसेनेतील अंतर्गत कलह त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडे आजच्या घडीला सर्वाधिक इच्छुक आहे. अगदी एका वार्डात चार-चार, पाच-पाच इच्छुक आहेत. त्यामुळे सर्वांना सांभाळून घेत, कुणालाही नाराज न करता उमेदवार घोषित करण्याबाबत पालकमंत्र्यांसह शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांचा कस लागणार आहे.
दुसरीकडे पालिकेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नाहीय. परंतू दोघं पक्ष महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत. तर दुसरीकडे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची जिल्हा बँक चेअरमन म्हणून निवडझाल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह संचारला आहे. तर आता एकनाथराव खडसे यांच्यासारखा ताकदवान नेता देखील आता राष्ट्रवादीत असल्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा आपल्या जुन्या जोशात आणण्यासाठी ज्ञानेश्वर महाजन, दीपक वाघमारे हे प्रयत्न करतील. दुसरीकडे कॉंग्रेसचे नेते डी.जी.पाटील हे आपले राजकीय कसब वापरून पालिकेत आपल्या कॉंग्रेसचा नगरसेवकांचा प्रवेश करण्यासाठी सर्व राजकीय डावपेज खेळतील.
विरोधी पक्ष म्हणून भाजपच्या नगरसेवकांनी जेवढे पालिकेचे वर्तुळ गाजवले पाहिजे होते, ते त्यांना गाजवता आलेले नाही. याउलट भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अॅड.संजय महाजन यांनी बाहेर राहून केलेली आंदोलन लक्षवेधी ठरलीत. अगदी शहरप्रमुख दिलीप महाजन आणि कन्हैय्या रायपूरकर यांनी देखील सत्ताधाऱ्यांना अनेकदा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे मात्र, सभागृहातील सदस्यांनी लक्षवेधी कामगिरी केली नाही. परंतू गटनेते कैलास माळीसर यांनी सुरुवातीच्या काळात आपल्या अभ्यासू भाषणांनी सर्वाना आकर्षित केले होते. थोडक्यात आगामी काही दिवसात भाजप मोठे राजकीय उलथापालथ करून यावेळी पालिकेवर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करेल.
मार्चच्या सुरुवातीस निवडणुका होण्याची शक्यता
पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप कच्चा आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच हा आराखडा नाशिक आयुक्तालयांकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आराखडा निश्चित होण्यास साधारण महिनाभरचा कालावधी लागून शकतो. त्यानंतरअंतिम प्रभाग रचना व आरक्षण सोडत होईल. त्यावर हरकती मागवल्या जातील. त्यामुळे पालिका निवडणुकांना आणखी किमान दीड-दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. थोडक्यात पालिकेची निवडणूक एकतर फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे.