जामनेर (प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे तत्कालीन लिपिक एन. आर. शेख यांना ४ लाख ९९ हजार दंड करण्यात आला आहे. कामातील अनियमितता व शासनाचे आर्थिक नुकसान केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
येथील तत्कालीन अव्वल कारकून एन. आर. शेख यांच्यावर पाच लाखांच्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. संजय गांधी निराधार योजना समिती व वरिष्ठांची स्वाक्षरी नसताना स्वतःच्याच स्वाक्षरीने लाभार्थ्यांना लाभ दिल्यासंदर्भात नगरसेवक शेख रिजवान अब्दुल लतीफ यांच्या तक्रारीवरून चौकशी केली होती.
जामनेर तहसीलमधील संजय गांधी निराधार विभाग दलालांनी घेरले आहे. केवळ दलालांकडून आलेले प्रकरणच मंजूर होत असून अशा लाभार्थ्यांनाच लाभ दिला जातो. संजय गांधी निराधार योजना समितीची मंजुरी न घेता परस्पर लाभार्थ्यांची नावे इतिवृत्तात समाविष्ट करण्यात आली. काही प्रकरणांमध्ये चुकीच्या पध्दतीने अनुदान वितरीत करून आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार नगरसेवक शेख रिजवान अब्दुल लतीफ यांनी १३३ नावांच्या पुराव्यांशी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्याकडे केली होती.
चौकशीअंती तक्रारीत तथ्य आढळून आले असून १३३ लाभार्थ्यांना चार लाख ९९ हजार रुपयांचा अनधिकृतपणे लाभ देण्यात आला आहे, हे स्पष्ट झाले. दरम्यान, धरणगाव येथील सध्या सेवेत असलेले पुरवठा निरीक्षक एन. आर. शेख यांच्या पगारातून ही रक्कम वसूल करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी यांनी जामनेर व धरणगावच्या तहसीलदारांना दिले आहे.