मुंबई (वृत्तसंस्था) देशभरात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा आजपासून (१ मार्च) सुरू होत आहे. या टप्प्यात ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि आजारी असलेल्या ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या नागरिकांना लसीसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. लसीकरण सरकारी रुग्णालये तसेच काही निवडक खासगी रुग्णालयात होणार आहे.
कोविड-१९ लसीकरणाचा तिसरा टप्पा आज १ मार्चपासून सुरू होत असून ६० वर्षे पूर्ण केलेले तसेच ४५ वर्षांवरील आजारी लोकांना या टप्प्यात प्राधान्यक्रमाने लस दिली जाईल. याशिवाय, सर्वसामान्यांसाठीही लसीकरण सुरू होत असून को-विन 2.0 (Co-WIN2.0) अॅप/ पोर्टलवर सकाळी ९ वाजता नोंदणी सुरू होईल. तसेच लसीकरण केंद्रांवरही नोंदणी करता येईल. या टप्प्यात १० हजार सरकारी व २० हजार खासगी रुग्णालयांत लसीकरणाची केंद्राची योजना आहे. राज्यात हा टप्पा पालिकांच्या तसेच शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांतूनही राबवला जाईल.
कोरोना लस २५० रुपयात मिळणार
सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोनाची लस मोफत मिळणार आहे. मात्र खासगी रुग्णालयांसाठी केंद्र सरकारने कोरोना लसीची किंमत निश्चित केली आहे. सरकारने त्याची किंमत २५० रुपये निश्चित केली आहे. खासगी रुग्णालये कोरोनाच्या लसीच्या प्रत्येक डोसाठी २५० रुपये शुल्क आकारू शकतात. म्हणजे एकूण दोन डोससाठी ५०० लागतील.
नोंदणी न केल्यास लस मिळणार का?
लसीकरणासंदर्भात यावेळी सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जे नोंदणी करत नाहीत त्यांना लस मिळणार की नाही? ऑनलाईन नोंदणी व्यतिरिक्त लोकांना ‘वॉक इन रजिस्ट्रेशन’ ची सुविधा देखील देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांना मोबाईल जास्त हाताळता येत नाही किंवा ऑनलाईन नोंदणी करता नाही, ते थेट रुग्णालयात जाऊन ही लस घेऊ शकतात. मात्र ऑनलाईन नोंदणी किंवा अॅपद्वारे नोंदणी करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
महाराष्ट्र, गुजरातसह ६ राज्यांत रुग्णवाढ
महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात या ६ राज्यांत रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ८६.३७ टक्के नवे रुग्ण याच राज्यांत आढळत आहेत. शिवाय ११३ मृत्यूही झाले आहेत. महाराष्ट्रात सलग सर्वाधिक ८,६२३ नवे रुग्ण आढळले.
विदर्भात कोरोनाचे ३३३६ नवे रुग्ण, २२ मृत्यू
पूर्व विदर्भातील ६ आणि पश्चिम विदर्भातील ५ अशा ११ जिल्ह्यांत मिळून रविवारी ३३३६ नवे रुग्ण आढळले, तर २२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. नागपूर ५, वर्धा १, अमरावती जिल्ह्यात ८, यवतमाळ व वाशीम प्रत्येकी ३ तर अकोला आणि बुलडाण्यात प्रत्येकी एक मृत्यू झाला.