सांगली(वृत्तसंस्था) : देवदर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचा ट्रक पलटी होऊन अपघात झाल्याची घटना कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे घडली आहे. ज्यामध्ये बेळगाव ३० वारकरी जखमी झाले असून त्यापैकी नऊ जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे.
बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील शिरहट्टी येथील सुमारे ५० वारकरी पंढरपूर येथे देवदर्शनासाठी शुक्रवारी निघाले होते. एका ट्रकमधून जाणाऱ्या या वारकऱ्यांच्या गाडीचा कवठेमहांकाळ तालुक्यातल्या विठ्ठलवाडी येथील रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अपघात झाला आहे. भरधाव असणाऱ्या ट्रक चालकाला महामार्गावर काही ठिकाणी काम चालू असल्याने पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज आला नाही. त्यामुळे भरधाव ट्रक समोर असणाऱ्या एसटीला जाऊन धडकला. त्यानंतर चालकाने जोरात ब्रेक दाबल्याने रस्त्यातल्या खड्ड्यातून ट्रक पलटी झाला. यामध्ये सुमारे ३० वारकरी गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमींना कवठेमहांकाळच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जखमींपैकी नऊ जणांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.